मुंबई, 2 जानेवारी : औरंगाबाद महापालिका निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा एकदा जुन्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापू लागलं आहे. औरंगाबादचं नामांतरण संभाजीनगर करण्यावरून पुन्हा एकदा राजकीय पक्षांमध्ये जुंपली आहे. औरंगाबादच्या नामांतराला काँग्रेसचा विरोध आहे. त्यात आघाडी सरकार असल्याने शिवसेना अडचणीत सापडली आहे. या वादात आता मनसेनेही उडी घेतली आहे. मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी ट्विट करीत शिवसेनेचे नेते आणि मंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर टीका केली आहे.
बाळा नांदगावकर यांनी एका वृत्तपत्राचं कात्रण ट्विट केलं आहे. यामध्ये अब्दुल सत्तार यांचं विधान अधोरेखित करीत प्रश्न उपस्थित केला आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय की, आता अब्दुल सत्तार खरं बोलत आहेत की खोटं? यामधील बातमीनुसार अब्दुल सत्तार म्हणाले की, मला उध्दव ठाकरे यांनीच औरंगाबाद म्हणण्याची परवानगी दिली आहे. आणि शिवसेनेचा नेता मीच आहे.
औरंगाबादचे नाव संभाजीनगर करण्यात यावे यासाठी मनसे, भाजप आणि शिवसेना आग्रही आहेत. पण त्यात शिवसेनेच्या नेत्याच्या अशा वक्तव्यामुळे सेनेच्या भूमिकेबद्दल प्रश्न निर्माण होत आहे. श्रेय केंद्र किंवा राज्य सरकार कुणीही घ्यावं पण नामकरण संभाजीनगर करावं असं मत बाळा नांदगावकर यांनी व्यक्त केले आहे
संभाजीनगर हेच नामकरण झाले पाहिजे, श्रेय केंद्र अथवा राज्य सरकार कोणीही घ्यावे. सेनेला केवळ एवढे विचारावे वाटते की तुमचे मंत्री अब्दुल सत्तार खरे बोलले कि खोटे? सोबत जोडलेला फोटो बरेच काही सांगून जात आहे. माननीय बाळासाहेबांचा शब्द व स्वप्न पूर्ण करावे. pic.twitter.com/oI2mxC3W69
— Bala Nandgaonkar (@BalaNandgaonkar) January 2, 2021
औरंगाबाद महापालिका निवडणुकीमुळे शहराच्या नामांतराच्या मुद्द्यांनं पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. काँग्रेसनं नामांतराला विरोध दर्शवताच विरोधी बाकांवरील भाजपानं त्यावरून शिवसेनेला भूमिका स्पष्ट करण्याबद्दल सवाल केला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.