'EDiot Hitler'चे टी शर्ट परिधान केल्याने मनसेच्या संदीप देशपांडेंना पोलिसांनी घेतलं ताब्यात

'EDiot Hitler'चे टी शर्ट परिधान केल्याने मनसेच्या संदीप देशपांडेंना पोलिसांनी घेतलं ताब्यात

'EDiot Hitler' (इडियट हिटलर) असा उल्लेख असलेला टी शर्ट परिधान केल्याने पोलिसांनी मनसे नेते संदीप देशपांडे यांना ताब्यात घेतले आहे.

  • Share this:

मुंबई, 22 ऑगस्ट- कोहिनूर मिलप्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची गुरुवारी ईडीसमोर चौकशी होणार आहे. या पार्श्वभूमीवर ईडी कार्यालय, कृष्णकुंज आणि दक्षिण मुंबई परिसरात कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांनी मनसैनिकांची धरपकड करण्यास सुरुवात केली आहे. 'EDiot Hitler' (इडियट हिटलर) असा उल्लेख असलेला टी शर्ट परिधान केल्याने शिवाजी पार्क पोलिसांनी मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांना ताब्यात घेतले आहे. संदीप देशपांडे सकाळच्या सुमारास ते जॉगिंगला आले असतानाच पोलिसांनी कारवाई करत त्यांना ताब्यात घेतले. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी त्यांना ताब्यात घेतल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

'EDiot Hitler' (इडियट हिटलर)चे टी शर्ट परिधान केल्याने अनेक मनसैनिक रस्त्यावर दिसत आहेत. मनसेचे पदाधिकारी संतोष धुरी यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आणि कीर्ती कॉलेज परिसरात घेऊन गेले आहेत. मुंबईच्या फोर्ट परिसरात असलेल्या ईडीच्या कार्यालयाबाहेर छावणीचं स्वरुप आले आहे. कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मोबाइल जामरही लावण्यात आला आहे.

राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना केलं भावनिक आवाहन!

राज ठाकरे यांना EDने नोटीस बजावल्यानंतर मनसेच्या कार्यकर्त्याने आत्महत्या केल्याची घटना घडल्याने खळबळ उडालीय. पोलीस आता या घटनेची चौकशी करत आहेत. या घटनेच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा कार्यकर्त्यांना संयम आणि सुबरीचा सल्ला दिलाय. राज म्हणाले, कार्यकर्त्यांना कळकळीची विनंती आहे की कोणीही टोकाचं पाऊल उचलू नका. ह्या आधी देखील अनेक कठीण प्रसंगांमधून आपण बाहेर पडलो आहोत त्यामुळे तुम्हा सर्वांच्या प्रेम आणि विश्वासाच्या जोरावर आपण ह्या प्रसंगावर देखील मात करू हे नक्की. एक निवेदन प्रसिद्ध करत राज ठाकरे यांनी हे आवाहन केलंय.

काय म्हणाले राज ठाकरे?

'आपला सहकारी प्रवीण चौगुले ह्याच्या निधनाच्या बातमीने माझं मन व्यथित झालं आहे. मला ईडीची नोटीस आली, ह्या बातमीने अस्वस्थ होऊन प्रवीणने आत्मदहनासारखा टोकाचा मार्ग निवडला. हे व्हायला नको होतं. प्रवीणच्या आत्म्यास शांती लाभो हीच ईश्वरचरणी इच्छा. प्रवीणचं जसं माझ्यावर, पक्षावर प्रेम होतं तसंच तुम्हा सगळ्यांचं माझ्यावर, आपल्या पक्षावर मनापासून प्रेम आहे ह्याची मला जाणीव आहे.'

आक्रमक मनसैनिकांनी पोलिसांकडून नोटीस

राज ठाकरेंविरोधात होणाऱ्या कारवाईमुळे आक्रमक झालेल्या मनसेच्या कार्यकर्त्यांवर पोलिसांची वक्रदृष्टी पडली असून अशा कार्यकर्त्यांना पोलिसांनी नोटीस बजावल्या आहेत. ठाणे, कल्याण आणि डोंबिवली शहरातील शेकडो कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना अशा प्रकाच्या नोटीस बजावण्यात आल्या असून काहींना हजर राहण्यास सांगण्यात आलं आहे. कलम 149 नुसार या नोटीस बजावण्यात आल्या आहेत. मनसेच्या अनेक नेत्यांनी आंदोलनाचे इशारे दिले होते. तर काहींनी खळ खट्याक आंदोलनाचाही इशारा दिला होता. ही सगळी परिस्थिती लक्षात घेऊन कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती निर्माण होऊ नये म्हणून अशा प्रकारच्या नोटीस दिल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. सामाजिक शांतता भंग झाली तर त्यासाठी तुम्हाला जबाबदार धरलं जाईल, असा इशाराही या कार्यकर्त्यांना देण्यात आलाय.

VIDEO : आदित्य ठाकरे पोहोचले सांगलीत, केली सरसकट कर्जमाफीची मागणी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 22, 2019 09:32 AM IST

ताज्या बातम्या