भाजपसोबत युती करण्याबाबत मनसेच्या नेत्यांचा मोठा खुलासा

भाजपसोबत युती करण्याबाबत मनसेच्या नेत्यांचा मोठा खुलासा

मध्यंतरी, राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात गुप्त बैठक झाल्याची माहिती पुढे आली होती.

  • Share this:

मुंबई, 14 जानेवारी :  मनसे आणि भाजप एकत्र येणार या चर्चेनं राजकीय धुरळा उडवून दिला. भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस हे नाही जरी म्हणत असले तरी भविष्यात एकत्र येऊ असं सांगून संकेतही देत आहे. आता मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी मनसेची भूमिका स्पष्ट केली आहे.

एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बाळा नांदगावकर यांनी भाजपसोबत युती होणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. भाजपसोबत जाण्याचा निर्णय आम्ही घेतलेला नाही. आतापर्यंत मनसेची जशी वाटचाल होती तशीच वाटचाल पुढेही स्वबळावर सुरू राहणार असल्याचं नांदगावकर यांनी स्पष्ट केलं.

मध्यंतरी, राज ठाकरे आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात गुप्त बैठक झाल्याची माहिती पुढे आली होती. महाराष्ट्राच्या राजकारणाच्या पुढच्या वाटचालीत ही भेट अतिशय महत्त्वाची मानली जात होती. मुंबईत या दोन्ही नेत्यांमध्ये दीड तास खलबतं चालल्याची माहिती समोर आली होती.

त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्यांदा यावर खुलासा केला. 'मनसे आणि भाजप एकत्र येण्याचा सध्या कोणताही विचार नाही. मनसेनं आपली विचार आणि कार्यपद्धत जर बदलली तर भविष्यात एकत्र येण्याचा विचार होऊ शकतो. पण सध्या मनसेची अशी कोणतीही विचार किंवा कार्यपद्धती व्यापक नाही. भाजप हा व्यापक विचाराने चालणारा पक्ष आहे. भविष्यात जर असा काही विचार झाला तर सर्वांनाच कळेल', असं म्हणत फडणवीस यांनी मनसेला सोबत घेण्याबाबत सूचक विधान केलं होतं.

मनसेचं महाअधिवेशन

23 तारखेला मुंबईत मनसेचे महाअधिवेशन होत आहे. या अधिवेशनात राज ठाकरे पक्षाची नवी भूमिका ठरविणार आहेत. गेली काही वर्षे राज ठाकरे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सातत्याने टीका करत होते. लोकसभा निवडणुकीच्या वेळी तर त्यांनी जाहीर सभांमधून व्हिडीओ दाखवत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सडकून टीका केली होती.

आता महाराष्ट्रातली परिस्थिती बदलल्याने राज ठाकरे वेगळा निर्णय घेण्याची शक्यता आहे. शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या सोबत गेल्याने मनसेची कोंडी झाली होती. कारण, मनसेनं विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीला साथ देणारी भूमिका घेतली होती. विधानसभेत सध्या मनसेचा एक आमदार आहे. या बदलत्या राजकारणाचा भाग म्हणून मनसे आपला झेंडाही बदलविणार असून हिंदुत्वाची कास धरण्याची शक्यता आहे.

मनसेचा झेंडा बदलणार

येत्या 23 जानेवारीला मनसेचं महाअधिवेशन मुंबईत होत असून त्यात राज ठाकरे पक्षाचे नवे धोरण जाहीर करणार आहेत. मनसेच्या राजकीय वाटचालीत हा निर्णय सर्वात महत्त्वाचा ठरणार असून मनसेला हा बदल यश मिळवून देणार का याकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे. सध्याच्या मनसेच्या झेंड्यात निळा, भगवा, पांढरा आणि हिरवा असे रंग आहेत तर मध्ये पक्षाचं चिन्ह असलेलं इंजिन आहे. नव्या झेंड्यात सर्व चारही रंग जाणार असून फक्त भगवा रंग असणार आहे आणि मध्यभागी 'शिवराजमुद्रा' असणार आहे. हा बदल म्हणजे मनसेची हिंदुत्वाकडे असलेली वाटचाल असल्याचे म्हटलं जात आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 14, 2020 10:21 PM IST

ताज्या बातम्या