Home /News /mumbai /

'धनुष्यातून ध्येयाचा वेध घ्यायचाय तर दोरी मागे ओढावी लागते', राज ठाकरे फडणवीसांना पाठवलेल्या पत्रात नेमकं काय म्हणाले?

'धनुष्यातून ध्येयाचा वेध घ्यायचाय तर दोरी मागे ओढावी लागते', राज ठाकरे फडणवीसांना पाठवलेल्या पत्रात नेमकं काय म्हणाले?

मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS chief Raj Thackeray) यांनी भाजपचे महाराष्ट्रातील पहिल्या फळीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना पत्र पाठवलं आहे.

    मुंबई, 1 जुलै : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS chief Raj Thackeray) यांनी भाजपचे महाराष्ट्रातील पहिल्या फळीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना पत्र पाठवलं आहे. या पत्रात राज यांनी फडणवीस यांना उपमुख्यमंत्रिपदाची सूत्रे हाती घेतले म्हणून कौतुक आणि अभिनंदन केलं आहे. राज ठाकरे यांच्या पत्रातून फडणवीस यांना पुढील राजकीय प्रवासासाठी शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. महाविकास आघाडीचं सरकार कोसळून राज्यात भाजप सत्तेत यावं यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी प्रचंड प्रयत्न केले. त्यांच्या या प्रयत्नांचा उल्लेख करत राज ठाकरे यांनी फडणवीसांचं कौतुक केलं. "आपल्या मनातील हुंदका बाजूला सारुन, पक्षादेश शिरसावंद्य मानून उपमुख्यमंत्रीपदाची सूत्रं हाती घेतलीत. पक्ष, पक्षाचा आदेश हा कुठल्याही व्यक्तीच्या आकांक्षापेक्षा मोठा आहे हे तुम्ही तुमच्या कृतीतून दाखवून दिलं", अशा शब्दांत राज ठाकरेंनी फडणवीसांची स्तुती केली. तसेच "धनुष्यातून ध्येयाचा वेध घ्यायचा तर दोरी मागे ओढावी लागते. यामागे ओढलेल्या दोरीला कुणी माघार म्हणत नाही", असं सूचक विधान देखील राज ठाकरेंनी पत्रातून केलं आहे. राज ठाकरे पत्रात नेमकं काय म्हणाले? "प्रिय देवेंद्रजी, सर्वप्रथम महाराषट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून आपण जबाबादारी स्वीकारल्याबद्दल आपले मन:पूर्वक अभिनंदन! वाटलं होतं की तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणूनच पुन्हा परताल, परंतु ते व्हायचं नव्हतं. असो...", असं राज ठाकरे पत्रात म्हणाले. "तुम्ही यापूर्वी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून सलग पाच वर्षे काम केले. आताचं सरकार आणण्यासाठीदेखील तुम्ही अपार कष्ट उपसलेत. इतकं असूनही आपल्या मनातील हुंदका बाजूला सारुन, पक्षादेश शिरसावंद्य मानून उपमुख्यमंत्रीपदाची सूत्रं हाती घेतलीत. पक्ष, पक्षाचा आदेश हा कुठल्याही व्यक्तीच्या आकांक्षापेक्षा मोठा आहे हे तुम्ही तुमच्या कृतीतून दाखवून दिलं. पक्षाशी बांधीलकी म्हणजे काय असतं त्याचा हा वस्तुपाठच आहे. ही गोष्ट देशातल्या आणि राज्यातल्या सर्व राजकीय पक्षातील आणि संघटनेतील पदाधिकऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी कायमस्वरुपी लक्षात ठेवण्यासारखी आहे. खरोखरंंच अभिनंदन!", अशा शब्दांत राज ठाकरेंनी फडणवीसांचं कौतुक केलं. (फडणवीस खरंच नाराज? किरीट सोमय्यांनी सांगितलं उपमुख्यमंत्रीपद स्विकारण्यामागचं कारण) "आता जरा आपल्यासाठी. ही बढती आहे की अवनती ह्यात मी जात नाही आणि कुणी जाऊही नये. पण एक सांगतो की, धनुष्यातून ध्येयाचा वेध घ्यायचा तर दोरी मागे ओढावी लागते. यामागे ओढलेल्या दोरीला कुणी माघार म्हणत नाही! तुम्हाला या पुढेही बराच राजकीय प्रवास करायचा आहे", असं राज ठाकरे म्हणाले. "एक निश्चित की तुम्ही तुमचं कर्तृत्व महाराष्ट्रापुढे सिद्ध केलेलंच आहे. त्यामुळे देशाच्या भल्यासाठीही तुम्हाला अधिक काम करण्याची संधी मिळो हीच आई जगदंबेचरणी प्रार्थना", असं राज ठाकरे पत्रात म्हणाले.
    Published by:Chetan Patil
    First published:

    Tags: BJP, Devendra Fadnavis, MNS, Raj Thackeray

    पुढील बातम्या