राम मंदिराबद्दल आधी उद्धव ठाकरेंच्या वक्तव्याने वाद, आता राज ठाकरे म्हणाले....

राम मंदिराबद्दल आधी उद्धव ठाकरेंच्या वक्तव्याने वाद, आता राज ठाकरे म्हणाले....

राज ठाकरे यांनीही राम मंदिर भूमिपूजनाबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

  • Share this:

मुंबई, 31 जुलै : अयोध्येत उभारण्यात येत असलेल्या राम मंदिर भूमिपूजनाची तारीख जवळ आल्यानंतर आता राजकीय मत-मतांतरे समोर येऊ लागली आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राम मंदिरांचं ई-भूमिपूजन व्हावं, असं म्हटल्यावर त्यांच्यावर टीका करण्यात येत होती. बजरंग दलाने शिवसेनेवर आक्रमक शब्दांमध्ये निशाणा साधला. मात्र त्यानंतर आता राज ठाकरे यांनीही राम मंदिर भूमिपूजनाबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

'राममंदिर व्हायलाच हवं, असंख्य कारसेवकांनी त्यासाठी प्राणांची आहुती दिली. त्यामुळे राममंदिराचं भूमिपूजन व्हायला हवं. पण सध्याची परिस्थिती बघता भूमिपूजनाची वेळ योग्य नाही,' असं राज ठाकरे यांनी एका मराठी वृत्तवाहिनीवरील कार्यक्रमादरम्यान म्हटलं आहे.

'लोकांच्या मनातील कोरोनाची भीती दूर झाल्यावर, सगळं स्थिरस्थावर झाल्यावर राममंदिराचं धुमधडाक्यात भूमिपूजन व्हायला हवं. हा लोकांच्या आनंदाचा भाग आहे त्यामुळे त्याचं ई-भूमिपूजन नको त्याचं जल्लोषात भूमिपूजन हवं,' असं म्हणत राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ई-भूमिपूजन करण्याच्या भूमिकेला विरोध केला आहे.

कसं होईल राम मंदिर भूमिपूजन?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 5 ऑगस्ट रोजी अयोध्येत राम मंदिराच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पडणार आहे. हा भूमिपूजनाचा सोहळा पार पडल्यानंतर त्याच दिवशी पंतप्रधानांच्या हस्ते राम मंदिराची प्रातिनिधिक चित्र असणारे आणि रामायणावर आधारित पोस्टाचे तिकीट प्रकाशित केले जाण्याची शक्यता आहे.

या दिवशी 22 किलो 600 ग्रॅम वजनाची चांदीची वीट ठेवून पाया रचला जाणार आहे. या वीटेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नावही लिहिण्यात आलं आहे. तसंच जय श्रीराम असंही लिहिण्यात आलं आहे. एवढंच नाहीतर या विटेवर राम मंदिराच्या भूमिपूजनाचा मुहूर्तही लिहिण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते राम मंदिराचं भूमिपूजन केलं जाणार आहे.

भूमिपूजनच्या दिवशी प्रभू रामचंद्र, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न यांच्या मूर्तींना रत्नजडीत पोशाख घातला जाणार आहे. रामदल सेवा ट्रस्टचे पंडित कल्कीराम हे पोशाख या मूर्तींना परिधान करतील. भूमिपूजन बुधवारी होणार आहे. त्या दिवसाचा रंग हिरवा असतो, त्यामुळे प्रभू रामचंद्र हे हिरव्या रंगाच्या पोशाखात दिसतील.

Published by: Akshay Shitole
First published: July 31, 2020, 6:08 PM IST

ताज्या बातम्या