मुंबई, 28 जानेवारी : मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुन्हा एकदा अॅक्शन मोडवर आले आहेत. मुंबईच्या आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंनी MIG Club येथे महत्त्वपूर्ण बैठक बोलावली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या बैठकीत आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रणनिती ठरविण्याबाबतची चर्चा होणार आहे. त्यासाठीच या बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. या बैठकीचं पक्षातील नेते, सरचिटणीस आणि शहर अध्यक्षांना निमंत्रण देण्यात आलं आहे. या बैठकीनंतर लगेच मुंबईत राज ठाकरे यांच्या सभेचं आयोजन होणार असल्याची चर्चा आहे.
राज्यातील आगामी महापालिकांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे पक्ष तयारीला लागला आहे. विशेष म्हणजे राज ठाकरे यांनी याआधीच मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. त्यासाठी मध्यंतरी राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र दौऱ्याचं नियोजन करण्यात आलं होतं. राज ठाकरे काही दिवसांपूर्वी औरंगाबाद दौऱ्यावर गेले होते. तसेच त्यांनी पुण्याचाही दौरा केला होता. राज ठाकरे गेल्या अनेक दिवसांपासून पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या भेटी घेत आहेत. मनसे पक्ष वाढवता येईल यासाठी महत्त्वाचे निर्णय घेत आहेत.
(14 वर्षांच्या मुलाला PUBG चं वेडं; आई-बहिणीसह संपूर्ण कुटुंबाची गोळी घालून हत्या)
मनसेचे ज्येष्ठ नेते बाळा नांदगावकर यांनी काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र दौऱ्याबाबत माहिती दिली होती. राज ठाकरे यांच्या औरंगाबाद आणि पुणे दौऱ्यानंतर ते उर्वीरित राज्यातही दौरे करणार असल्याचं नांदगावकर यांनी सांगितलं होतं. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार राज ठाकरे आगामी काळात पश्चिम महाराष्ट्र, कोकण, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातही जाणार आहेत.
मुंबईत महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारण पेटलं
मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे. शिवसेना आणि भाजप यांच्यात मुंबईत टोकाचा संघर्ष बघायला मिळतोय. विशेष म्हणजे हा संघर्ष याआधी अनेकदा बघायला मिळाला होता. तरीही आता मालाडमधील मैदानाच्या नामकरणाच्या मुद्द्यावरुन भाजप प्रचंड आक्रमक झाली आहे. दोन दिवसांपूर्वी मालाडमध्ये क्रीडा संकुलाच्या बाहेर प्रचंड गदारोळ बघायला मिळाला होता. नामकरणाच्या मुद्द्यावरुन भाजपचे शेकडो कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.