मुंबई 23 जानेवारी : 'मनसे'च्या महाअधिवेशनापासून राज ठाकरे हिंदुत्वाची भूमिका घेणार असल्याचं आता स्पष्ट झालंय. महाविकास आघाडीमुळे शिवसेना हिंदुत्वावर मवाळ झालीय. तर आता मनसे कात टाकत हिंदुत्वावर आक्रमक होणार आहे. मनसेच्या नेत्यांनी त्यावर बोलायला सुरुवात केलीय. मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी तर एक पाऊल पुढे जात राज ठाकरे हे दुसरे हिंदुह्रदयसम्राट असतील असं मत व्यक्त केलं होतं. त्यावर आता राजकीय क्षेत्रातून प्रतिक्रिया यायला सुरुवात झालीय. भाजपचे प्रवक्ते गणेश हाके यांनी गंभीर आरोप करत राज ठाकरेंच्या नव्या भूमिकेमागे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांचं डोकं असल्याचा आरोप केलाय.
गणेश हाके म्हणाले, शिवसेना आता हिरवी झालीय. त्यामुळे हिंदुत्ववादी मतांमध्ये फुट पडावी यासाठी शरद पवार यांनीच राज ठाकरेंना प्रेरणा दिली असावी असंही मतही त्यांनी व्यक्त केलं. असं फुट पाडण्याचं राजकारण पवार हे कायम करत आले आहेत. त्यामुळे ही खेळी शरद पवारांचीच असावी असंही हाके यांनी सांगितलंय.
Network नसल्याने नागरीकांचा संताप, अकोल्यात पालिकेसमोर 'मोबाईल फोडो' आंदोलन
तर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी राज ठाकरेंच्या नव्या भूमिकेचं स्वागत केलंय. शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या जवळ गेल्याने हिंदुंत्वाची भूमिका पातळ झालीय. ती पोकळी भरून काढण्यासाठी राज ठाकरे भूमिका घेत असतील तर त्याचं स्वागत करायला पाहिजे असं मतही दरेकर यांनी व्यक्त केलं.
'राज' दुसरे हिंदुह्रदयसम्राट?
मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी तर एक पाऊल पुढे जात राज ठाकरे हे दुसरे हिंदुह्रदयसम्राट असतील असं मत व्यक्त केलं होतं. त्यामुळे मनसेची पुढची दिशा स्पष्ट होते. हा शिवसेनेला मोठा धक्का असल्याचं मानलं जात असतानाच आता त्यावर शिवसेनेनं पहिल्यांदाच आपली प्रतिक्रिया व्यक्त केलीय.
23 जानेवारी हा बाळासाहेबांचा जन्मदिवस आहे. ते निमित्त साधून मनसेचा महामेळावा होतोय. यावर बोलताना शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे म्हणाले, हिंदूह्रदयसम्राट केवळ बाळासाहेबच आहेत आणि राहतील. दुसरे कुणी हिंदूह्रयसम्राट होवू शकत नाही. पार्टीचा झेंडा बदलून, विचार बदलून काहीही होणार नाही. हिंदुत्वापासून आम्ही दूर जात नाही आणि जाणारही नाही. कुणी काय करतंय त्याचा आमच्यावर काही फरक पडत नाही.