मनसे सुपारी घेतल्याशिवाय कामच करू शकत नाही, सेनेच्या नेत्याची विखारी टीका
'ज्या भाजपच्या (BJP) नेत्यांना मागच्या निवडणुकीत अगदी ठसठशीत 'लाव रे तो व्हिडीओ करून उघडं नागडं केलं. आता नागड्या बरोबर उघडा झोपला तर काय परीस्थिती होते हे पुढे दिसेलच'
मुंबई, 23 नोव्हेंबर : 'बदलत्या राजकारणाची नांदी आहे का माहिती नाही. पण मनसे (MNS) सुपारी घेतल्याशिवाय काम करू शकत नाही. कारण, त्यांच्या पक्षाचे अस्तित्वच हे त्यावर अवलंबून आहे, त्यामुळे आज ना उद्या कुणाची सुपारी घ्यायची आहे', अशी घणाघाती टीका शिवसेनेचे (Shivsena) नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांनी केली आहे.
मुंबईत पत्रकारांशी बोलत असताना अनिल परब यांनी वीज बिलाच्या मुद्यावरून मनसे आणि भाजपवर सडकून टीका केली आहे.
मनसे सुपारी घेतल्याशिवाय काम करू शकत नाही, शिवसेनेचे मंत्री अनिल परब यांची टीका pic.twitter.com/nQq4gIqwyC
'भाजप आणि मनसे एकाच मुद्यावर आंदोलन करत आहे. आता हे नवी समिकरणं आहे की नाही, हे माहीत नाही. पण त्यांना तर कुणाची ना कुणाची सुपारी घ्यावी लागते. त्यांच्या पक्षाचं अस्तित्वच त्याच्यावर आहे. ज्या भाजपच्या नेत्यांना मागच्या निवडणुकीत अगदी ठसठशीत 'लाव रे तो व्हिडीओ करून उघडं नागडं केलं. आता नागड्या बरोबर उघडा झोपला तर काय परीस्थिती होते हे पुढे दिसेलच' असा सणसणीत टोला परब यांनी लगावला.
तसंच, 'कोरोनाची परिस्थिती असल्यामुळे आतापर्यंत कोणत्याही मोर्चाला परवानगी देण्यात आली नाही. त्यामुळे मनसेच्या मोर्चाबद्दल काय निर्णय घ्यायचा आहे, तो घेतला जाईल', असे संकेतही परब यांनी दिले.
'मुंबई महापालिका निवडणूक आहे. आम्ही येणाऱ्या निवडणुकींना सामोरे जाऊ आणि विश्वासाने निवडणुका जिकू', असा विश्वासही परब यांनी व्यक्त केला.
7 डिसेंबरला सल्लागार समितीची बैठक आहे. त्यानंतर हिवाळी अधिवेशन घ्यायचं की पुढे ढकलायचं हे ठरवलं जाईल पण अधिवेशन मुंबईतच होईल, असा दावाही परब यांनी केला.
'निवडणुका कशा लढवणार याचा निर्णय पक्षाचं नेतृत्व ठरवणार आहे. मुंबईत निवडणूक लढवण्यासाठी शिवसेनेला वेगळी तयारी करावी लागते असं मला वाटत नाही. शिवसेना 365 दिवस कार्यरत असते. निवडणुका एकत्र लढवायच्या की नाहीत याचा निर्णय तीनही पक्षांचे प्रमुख ठरवतील', अशी माहितीही परब यांनी दिली.