Home /News /mumbai /

अमित ठाकरेंनी मानले मुख्यमंत्री काकांचे आभार, म्हणाले...

अमित ठाकरेंनी मानले मुख्यमंत्री काकांचे आभार, म्हणाले...

'हा लोकांच्या संघर्षाचा विजय आहे. मी समजू शकतो आज आरे कारशेडसाठी आंदोलन करणारी लोकं किती आनंदी असतील'

    मुंबई, 11 ऑक्टोबर : गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या आरे बचाव आंदोलनाला अखेर यश आले आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आरे मेट्रो कारशेडचा निर्णय रद्द केला आहे. उद्धव ठाकरे यांचे पुतणे आणि मनसेचे नेते अमित ठाकरे यांनी या निर्णयाचं स्वागत केले आहे. 'हा लोकांच्या संघर्षाचा विजय आहे. मी समजू शकतो आज आरे कारशेडसाठी आंदोलन करणारी लोकं किती आनंदी असतील. अनेकांनी आंदोलन करताना अंगावर केसेस घेतल्या होत्या. त्या सगळ्यांच्या लढ्याला यश आलं आहे', असं म्हणत अमित ठाकरे यांनी ठाकरे सरकारचे आभार मानले आहे. आरेच्या जंगलात मेट्रो कारशेड उभारण्याचा निर्णय मागील सरकारने घेतला होता. यासाठी हजारो झाडांची कत्तल करण्यात आली होती. पण, शिवसेनेसह मनसे आणि पर्यावरण प्रेमींनी या कारशेडला कडाडून विरोध केला होता. अमित ठाकरे राजकारणात सक्रीय होण्याआधी आरे कारशेडसाठी आंदोलन केले होते. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आरेमधील मेट्रोचा कारशेड कांजुरमार्गला हलवण्याची घोषणा केली आहे. 'पर्यावरणाचा ऱ्हास करून होणारी प्रगती मान्य होणारी नसल्याने आरे येथील मेट्रो कार शेड कांजूरमार्ग येथील सरकारी जमीनीवर करण्याचा निर्णय शासनाने घेतला असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज केली. टही जागा शुन्य रुपये खर्च करून कारशेडसाठी घेण्यात आली आहे, शासनाचा एक ही पैसा ही जमीन खरेदी करण्यासाठी खर्च झालेला नाही',  हे ही त्यांनी स्पष्ट केले. तसंच, आरे वाचवा मोहिमेत ज्या पर्यावरणवाद्यांनी सहभागी होऊन आंदोलन केले त्या सर्व आंदोलकांवरील गुन्हे शासन मागे घेणार असल्याचं ही त्यांनी आज सांगितलं. आरेतील 800 एकर जंगल राखीव घोषित आरेमधील 800 एकर जागा शासनाने जंगल म्हणून राखीव करण्याचा निर्णय घेतला आहे. असे करतांना तिथे असणाऱ्या आदिवासी पाड्यातील लोकांच्या आणि तबेलांच्या अस्तित्वाला धोका न लावता संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाला लागून असलेले हे वन शासनाने राखीव जंगल म्हणून घोषित करण्याचा निर्णय घेतला आहे. आरेमध्ये मेट्रो कारशेडसाठी उभारण्यात आलेली इमारत ही इतर कारणासाठी वापरता येईल. त्यामुळे त्यासाठी खर्च झालेला निधी ही वाया जाणार नसल्याचेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या