मुंबई, 21 ऑगस्ट : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांनी पुण्यातील पत्रकार परिषदेत शरद पवारांनी (Sharad Pawar) दिलेल्या सल्ल्याला प्रत्युत्तर दिलं. त्यानंतर याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली. अमोल मिटकरी यांनी केलेल्या वक्तव्यावर मनसेचे नेते अमेय खोपकर (Amey Khopkar) यांनी आपल्या खास शैलीत प्रत्युत्तर दिलं आहे. त्यामुळे आता मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांच्यातील वाद (MNS vs NCP) वाढताना दिसत आहे.
अमेय खोपकर यांनी ट्विट करत म्हटलं, "आत्ता कुठे मिसरुड फुटलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदाराने राजसाहेबांचं नुसतं नाव उच्चारतानाही दहावेळा विचार करायला हवा. राजसाहेबांवर मिटकरीसारख्या बगलबच्च्यांनी टीका वगैरे करणं म्हणजे निव्वळ पोरकटपणा आहे. दोन मोठी माणसं बोलत असताना आपलं तोंड मिटून ठेवावं हे एका राष्ट्रीय म्हणवणाऱ्या पक्षाच्या नेत्याला कळू नये, हे केवढं मोठं दुर्दैव."
— Ameya Khopkar (@MNSAmeyaKhopkar) August 21, 2021
काय म्हणाले होते अमोल मिटकरी
शरद पवारांच्या सल्ल्यावर राज ठाकरेंनी प्रतिक्रिया दिल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी त्यावर भाष्य केलं. अमोल मिटकरी म्हणाले होते, राष्ट्रवादी पक्षावर जातीयवादाचा आरोप कोण करतोय तर ज्यांनी महाराष्ट्रात दक्षिण भारतीय व उत्तर भारतीय हा द्वेष निर्माण करण्याचे महापातक करुन राष्ट्रदोह केला ती व्यक्ती. अपयशी नेत्याला उत्तर देणे म्हणजे घाणीवर दगड फेकून अंगावर घाण उडवून घेणे आहे.
पुण्यातील पत्रकार परिषदेत राज ठाकरे म्हणाले, मी एका कार्यक्रमात जातीपातीच्या विषयाबद्दल विधान केले होते. पण माझ्या विधानाचा आणि माझे आजोबा प्रबोधनकार ठाकरे यांच्या विधानाचा काय संबंध होता. मी प्रबोधनकार ठाकरे यांची पुस्तकंही वाचली आहे आणि यशवंतराव चव्हाण यांची पुस्तकं सुद्धा वाचली आहे. मी जे काही बोललो त्याचा माझ्या आजोबांच्या पुस्तकांचा काय संबंध होता हे शरद पवार यांनी समजून सांगावे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.