धनंजय दळवी, प्रतिनिधी
मुंबई, 18 मार्च : आजकाल तुम्ही मराठी शाळेत शिकलाय असं सांगितलं तर लोक तुमच्याकडे अतिशय वेगळ्या नजरेने बघतात. कारण, तुम्ही कोणत्या शाळेत शिक्षण घेता हा स्टेटसचा विषय झाला आहे. मात्र, तुम्हाला विश्वास बसणार नाही मराठी शाळेतील शिक्षक सुद्धा राष्ट्रीय पातळीवर दखल घ्यावी लागेल असे उपक्रम आपल्या शाळांमध्ये राबवत असतात. असे अनेक शिक्षक आहेत जे देशाचं भविष्य असलेल्या मुलांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी दिवस रात्र मेहनत करून विविध उपक्रम अभ्यासक्रमात आणत आहेत. अशाच एक मुंबईतील मराठी शाळेच्या शिक्षिका आहेत मिताली तांबे. मिताली तांबे यांनी त्यांच्या शाळेत राबवलेल्या उपक्रमासाठी आता त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे.
कोणता राबवला नवोपक्रम?
शिक्षण क्षेत्रात नवोपक्रम करणाऱ्या शिक्षकांचा गौरव करण्यासाठी राष्ट्रीय स्तरावरील 'सर फाउंडेशन टीचर इनोव्हेशन नॅशनल अवॉर्ड' दिला जातो. यामध्ये देशभरातील 169 प्रयोगशील शिक्षक व क्षेत्रीय अधिकाऱ्यांचा समावेश आहे. प्राथमिक, माध्यमिक, शिक्षक केंद्रप्रमुख, साधन व्यक्ती, विषय सहाय्यक, शिक्षक विस्तार अधिकारी गटशिक्षणाधिकारी, अधिव्याख्याता यांचा समावेश असतो. शिक्षकांनी शालेय स्तरावर केलेल्या विविध नाविन्यपूर्ण उपक्रम व शैक्षणिक प्रयोगाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी केलेल्या प्रयत्नांची निवड यातून करण्यात आली आहे. मुंबईतील घाटकोपर येथील भैरव विद्यालयाच्या शिक्षिका मिताली महेंद्र तांबे यांना या राष्ट्रीय पुरस्काराच्या मानकरी ठरल्या त्यांनी चला साधू या समन्वय गणिताचा हा नवोपक्रम सादर केला आहे.
भैरव विद्यालयात मिताली तांबे या गेल्या 21 वर्षांपासून सहाय्यक शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. चला साधू समन्वय गणिताचा हा उपक्रम 2020 साली प्रादेशिक विद्या प्राधिकरण मुंबई येथे सादर केला होता. या उपक्रमाला त्या ठिकाणी प्रथम क्रमांक मिळाला होता. तसेच सर फाउंडेशन इनोव्हेशन नॅशनल अवॉर्ड देखील मिळाला आहे.
कलेमधून शिक्षण
गणितातील अमूर्त संकल्पना मृत स्वरूपात येऊ शकतात. फक्त फळ आणि खडू ही पारंपारिक पद्धत न वापरता अनेक लहान मोठ्या उपक्रमातून, खेळाच्या माध्यमातून मुलांना कसं क्रियाशील करता येईल, मुलांना गणिताची आवड कशी निर्माण होईल यादृष्टीने विचार सुरू केले. या विचारातून अनेक साहित्याचा वापर करत शाळेमध्ये एक गुणवत्ता कक्ष तयार केला आहे. या कक्षामध्ये अनेक विषयांवरील साहित्यांची रेलचेल होते. चला साधू समन्वय गणिताचा हा उपक्रमातून विद्यार्थ्यांना गणित हा विषय फक्त गणितातून न शिकवता विविध कला, विविध विषय, गणित आणि मातीकाम, गणित आणि पाककला, गणित आणि हस्तकला, या सर्व विषयांचा समन्वय साधून अशा प्रकारचे विविध 15 उपक्रम हाती घेतले आहेत,असं मिताली तांबे यांनी सांगितले.
Solapur News: सापशिडीतून शिकवलं गणित, कल्पक शिक्षकाला मिळाला मोठा पुरस्कार! Video
उपक्रमातून मार्गदर्शन
भैरव विद्यालय हे 1994 रोजी घाटकोपर मध्ये सुरू झाले. या उपक्रमशीलतेमध्ये मिताली तांबे या शिक्षिका 2001 पासून भैरव विद्यालयात सेवार्थ आहेत. पहिल्यापासूनच त्यांचा एक उपक्रम शिक्षिका म्हणून त्यांची ओळख आहे. तसेच विद्यार्थी प्रिय अशा त्या शिक्षिका आहेत. खास करून गणित या विषयात विद्यार्थ्यांना विविध उपक्रमातून खेळाच्या माध्यमातून मार्गदर्शन करणे. यासाठी त्यांना अनेक संस्थांनी आणि राज्यस्तरीय पुरस्कार देखील मिळालेला आहे, असं वसंत चव्हाण सांगतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.