विवेक कुलकर्णी, मुंबई 18 ऑगस्ट : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना ईडीने रविवारी नोटीस बजवली होती. या घटनेने महाराष्ट्राच्या राजकीय क्षेत्रात खळबळ उडालीय. मनसेने यावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली होती. मंत्री गिरीश महाजन यांनी या प्रकरणात भाजपवर होत असलेल्या आरोपांवर पहिल्यांदाच प्रतिक्रिया व्यक्त केलीय. राज यांनी काही केलं नसेल तर त्यांना घाबरण्याचं कारण नाही. या घटनेचा राजकारणाशी संबंध नाही असं मत महाजन यांनी व्यक्त केलंय. तर नरेंद्र मोदींविरोधात आवाज उठवला त्यामुळेच ही नोटीस बजावण्यात आल्याचं मनसेनं म्हटलंय.
गिरीश महाजन म्हणाले, ईडी ही स्वायत्त संस्था आहे, कोणत्याही राजकीय कारणासाठी राज ठाकरेंना नोटीस बजावली नाहीये. राज यांनी काही केलं नसेल तर त्यांनी घाबरण्याची आवश्यकता नाही. मनसेनं आंदोलन करावं किंवा नाही हा त्यांचा प्रश्न आहे. राज ठाकरे यांना 21 ऑगस्टला चौकशीला हजर राहण्यास सांगण्यात आलंय. दादरमध्ये मोक्याच्या ठिकाणी असणाऱ्या कोहिनूर मिल खरेदी-विक्री प्रकरणात ही नोटीस बजावण्यात आलीय.
VIDEO: तुझ्या गाडीची हवा इथेच काढेन, आमदार अंजली निंबाळकर यांचा रूद्रावतार
भाजप सुडाचं राजकारण करत असून मनसे अशा नोटीशींना भीक घालत नाही. आम्ही कायदेशीर लढाई लढू. केवळ दडपशाहीच्या हेतूनेच ही नोटीस बजावण्यात आल्याचा आरोप मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी केलाय. देशपांडे म्हणाले, कोहिनूर मिलचं प्रकरण अतिशय जुनं आहे. एवढी वर्ष झाल्यानंतर सरकारला आत्ताच जाग का आली असा सवाल त्यांनी केला. राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात लोकसभा निवडणुकीच्या काळात जोरदार आवाज उठवला होता. त्यामुळेच त्यांना ही नोटीस बजावण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला.
बाप्पाच्या आगमनात खड्ड्यांचे 'विघ्न'; गणेशभक्तांमध्ये संताप
राज्यात विधानसभा निवडणुका आता काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. सर्वच पक्षांची जोरदार तयारी सुरू आहे. या पार्श्वभूमीवर राज यांना नोटीस मिळाल्याने राजकारण तापण्याची शक्यता आहे. येत्या 21 तारखेला मुंबईत EVM विरोधात सर्व पक्षीय मोर्चा आहे. त्यासाठी राज ठाकरे यांनी पुढाकार घेतलाय. त्यानंतर एक दिवसांनी राज यांना चौकशीला सामोरे जावं लागणार आहे.
राज यांनी दिल्लीत जाऊन मुख्य निवडणुकांची भेट घेतली होती. त्याचबरोबर कोलकात्यात जाऊन ते ममता बॅनर्जींनाही भेटले होते. त्यांनीही पूर्ण पाठिंबा व्यक्त केला होता.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा