मंत्री आदित्य ठाकरेंचं काका राज ठाकरेंच्या पावलावर पाऊल, घेतला 'हा' निर्णय

मंत्री आदित्य ठाकरेंचं काका राज ठाकरेंच्या पावलावर पाऊल, घेतला 'हा' निर्णय

Aditya Thackeray: राज्याचे पर्यटन, पर्यावरण आणि राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांचा 13 जून रोजी वाढदिवस आहे.

  • Share this:

मुंबई, 11 जून: ठाकरे घराण्यातील राज ठाकरे (Raj Thackeray) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे चुलत बंधू दोन्ही वेगवेगळ्या पक्षांचे प्रमुख आहेत. मतभेदामुळे राज ठाकरेंनी आपला वेगळा पक्ष स्थापन केला. मात्र, दोन्ही पक्षांच्या भूमिकाही जवळपास एकसारख्याच आहेत. असे असताना आता युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी असा एक निर्णय घेतला आहे ज्यामुळे आता चर्चांना उधाण आले आहे. होय, कारण हा निर्णय म्हणजे आदित्य यांचे काका म्हणजेच राज ठाकरे यांच्या निर्णयाप्रमाणेच आहे.

आदित्य ठाकरेंनी केलं ट्विट

मागील वर्षापासून आपण कोरोनाच्या महासंकटाशी लढत आहोत आणि आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळेच हे शक्य झाले. आपल्याला आता संभाव्य तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी सज्ज व्हायचे आहे. मास्क लावणे, अंतर पाळणे, गर्दी होऊ न देणे हा या आजाराला हरवण्याचा हमखास उपाय आहे. त्यामुळेच यंदा माझ्या वाढदिवसानिमित्त कोणताही कार्यक्रम, सोहळा करण्याचे टाळत आहे.

आदित्य यांनी पुढे म्हटलं, माझी आपणा सर्वांना हीच विनंती आहे की कृपया कुठेही गर्दी करु नका. आपण मला प्रत्यक्ष भेटण्यासाठी येऊ नये, ही नम्र विनंती. आपण प्रत्यक्ष भेटला नाहीत तरी आपणा सर्वांच्या शुभेच्छा, प्रेम, आशीर्वाद माझ्यासोबत आहेतच आणि त्या कायम राहतील, हा विश्वासही आहे. वाढदिवसानिमित्त होर्डिंग्स, हार, केक अशा गोष्टींवर खर्च करू नये, असेही मला मनापासून वाटते. त्याऐवजी कोरोनाला हरवण्यासाठीचे नियम पाळणे, इतरांना शक्य ती मदत करणे हीच वाढदिवसाची अमूल्य भेट. घरी रहा, सुरक्षित रहा.

सकाळीच राज ठाकरेंनी केलं आवाहन

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही सकाळी एक पत्रक काढून आपल्या कार्यकर्त्यांना आवाहन केलं आहे. आपल्या पत्रकात राज ठाकरेंनी म्हटलं, हेही वर्ष बिकट आहे. मागच्या वर्षीसारखंच. अजूनही कोरोनानं महाराष्ट्राला घातलेले विळखा सोडलेला नाही. लॉकडाऊन उठतो आहे. परंतु परिस्थिती अजूनही गंभीर आहेच. अशा वातावरणात वाढदिवस वगैरे साजरा करणं मनाला पटत नाही. माझे सहकारी म्हणून तुम्ही हे नक्की मसजून घ्याल. हे वातावरणच असं आहे की आपण सावध असलं पाहिजे. खबरदारी घेतली पाहिजे. प्रवास करणं, मोठ्या प्रमाणात गर्दी करणं, गाठी-भेटी अशा गोष्टी करणं अजूनही टाळल्या पाहिजेत.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलेल्या या आवाहनानंतर पुतणे आदित्य ठाकरे यांनीही आपल्या कार्यकर्त्यांना आवाहन केल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चा सुरू झाल्या आहेत. काकांच्या पावलावर आदित्य ठाकरेंचे पाऊल अशी जोरदार चर्चा रंगण्यास सुरूवात झाली आहे.

First published: June 11, 2021, 11:05 PM IST

ताज्या बातम्या