मुंबई 03 नोव्हेंबर: मेट्रो प्रकल्पावरून राज्यात आता राजकारणाने वेगळं वळण घेतलं आहे. या विषयावरून अमृता फडणवीस यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. राज्य सरकार (Mhaharashtra government) म्हणजे डिझास्टर आहे. अल्प बुद्धी, बहु गर्वी - कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र आमचा? असं ट्विट अमृता फडणवीसांनी (Amruta fadnavis) म्हटलं आहे. या आधीही त्यांनी अनेकदा राज्य सरकारवर थेट टीका केली होती.
राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर अमृता फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर जोरदार हल्लाबोल सुरू केलाय. शिवसेनेनेही त्याला तसेच उत्तर दिले आहे. आता हा हल्ला आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.
मेट्रो प्रकल्पावरून आशिष शेलार यांनी केलेल्या ट्विटवर कमेंट करत अमृता फडणवीस यांनी ही टीका केलीय.
अल्प बुद्धी , बहु गर्वी - कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र आमचा ? #maharashtragovt #disaster https://t.co/qU7QB0w49h
— AMRUTA FADNAVIS (@fadnavis_amruta) November 3, 2020
मुंबईतल्या मेट्रो कारशेडचा वाद आता आणखी पेटला आहे. केंद्र सरकारने कांजुरच्या जागेवर हक्क सांगितल्याने या वादाला वेगळं वळण मिळालं होतं. आता पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी केंद्राच्या दाव्याला थेट आव्हान दिलंय. कांजुरमार्गची जागा ही महाराष्ट्राचीच असून त्याचे सगळे पुरावे आमच्याकडे आहेत असा दावा त्यांनी केला आहे. त्यामुळे आता केंद्र आणि राज्य सरकारमधला वाद आता आणखी पेटण्याची शक्यता आहे.
मेट्रो कारशेडचं काम थांबणार नाही असंही आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केलं. संबंधित जमीन महसूल विभागाची असून मुंबई उपनगर जिल्हाधिकाऱ्यांनी जमिनीच्या सर्व न्याय प्रविष्ट बाबी पूर्ण केल्याची माहितीही आदित्य ठाकरे यांनी ट्विटरवरून दिली आहे.
मेट्रो कारशेडला कांजूरमार्गला हलवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. भाजपने (BJP) राज्य सरकारच्या या निर्णयाला विरोध केला होता. पण, आता या वादात केंद्र सरकारनेही उडी घेतली आहे. केंद्र सरकारने कांजूरमार्ग येथील मेट्रो कारशेडचे काम थांबवण्याचे आदेश दिले आहे. याबद्दल केंद्राने राज्याच्या मुख्य सचिवांना एक पत्र पाठवले आहे.