• Home
  • »
  • News
  • »
  • mumbai
  • »
  • शरद पवार आणि उद्धव ठाकरेंमध्ये बैठक सुरू, लॉकडाऊनबाबत महत्त्वाची चर्चा

शरद पवार आणि उद्धव ठाकरेंमध्ये बैठक सुरू, लॉकडाऊनबाबत महत्त्वाची चर्चा

केंद्र सरकारने जाहीर केलेल्या लॉकडाऊनच्या पाचव्या टप्प्याची महाराष्ट्रात नेमकी कशी अंमलबजावणी केली जाते, याबाबतचं चित्र पवार-ठाकरे बैठकीनंतर स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

  • Share this:
मुंबई, 30 एप्रिल : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात वर्षा बंगल्यावर महत्त्वाची बैठक सुरू झाली आहे. या बैठकीत लॉकडाऊन 5 संदर्भात महत्वाची चर्चा सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे केंद्र सरकारने जाहीर केलेल्या लॉकडाऊनच्या पाचव्या टप्प्याची महाराष्ट्रात नेमकी कशी अंमलबजावणी केली जाते, याबाबतचं चित्र पवार-ठाकरे बैठकीनंतर स्पष्ट होण्याची शक्यता आहे. शरद पवार यांनी याआधीही मुंबईतील लोकल ट्रेन सुरू करण्याच्या बाजूने मत मांडलं होतं. त्यानंतर अर्थचक्राला गती देण्यासाठी लॉकडाऊनमध्ये जास्तीत जास्त शिथिलता आणली गेली पाहिजे, अशी राष्ट्रवादीतील अनेक नेत्यांची भूमिका आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत शरद पवार नेमका काय सल्ला देतात, हे पाहावं लागेल. दरम्यान, कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या पाचव्या टप्प्याचीही घोषणा केंद्र सरकारकडून करण्यात आली आहे. 30 जूनपर्यंत असणारा लॉकडाऊनचा हा टप्पा याआधी करण्यात आलेल्या लॉकडाऊनपेक्षा वेगळा असणार आहे. कारण या टप्प्यात निर्बंध शिथिल करत मोठी सूट देण्यात आली आहे. आंतरराज्य हालचालींवरील निर्बंध हटवण्यात आले आहेत. तसंच 8 जून नंतर कन्टेमेंट झोनशिवाय इतर भागातील मंदिर, रेस्टॉरंट, शॉपिंग मॉल उघडण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. अनेक दिवसांच्या लॉकडाऊनमुळे देशातील आर्थिक स्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. हातावर पोट असणाऱ्या गरीब लोकांचे मोठे हाल होत होते. त्यामुळे लॉकडाऊन उठवण्याची किंवा त्यामध्ये मोठी शिथिलता आणण्याची मागणी सातत्याने समोर येत होती. त्यानंतर आता केंद्र सरकारने लॉकडाऊन वाढवला असला तरीही त्यामध्ये मोठी सूट दिली आहे.
Published by:Akshay Shitole
First published: