24 मे : गेल्या काही दिवसांपासून थंड असलेल्या मराठा क्रांती मोर्चाची पुन्हा एकदा राज्यात चर्चा सुरू झाली आहे. मराठा क्रांती मूक मोर्चाचं भगवं वादळ पुन्हा महाराष्ट्रात घोंघावणार आहे. यावेळी ते राज्याच्या राजधानीत येणार आहे. मुंबईत 9 ऑगस्टला क्रांतीदिनी मराठा मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चाची सध्या जोरदार तयारी सुरू आहे.
मोर्चापूर्वी किल्ले रायगडावर सहा जूनला कटीबद्धतेची शपथ घेतली जाणार आहे. 13 जुलैला कोपर्डीत मराठा कार्यकर्ते गोळा होणार. आणि त्यानंतर 9 ऑगस्टला मुंबईत धडकणार आहेत.
मुंबईतल्या मोर्चाला देशभरातून मराठा समाज आणण्याचं नियोजन आहे. शिवाय मराठी क्रांती मोर्चाच्या आयोजकांनी समन्वय समितीची स्थापना केलीये. ही समन्वय समिती बोलणार तोच मराठा समाजाचा शब्द असणार असं आयोजकांनी सांगितलंय.
गेल्या काही दिवसांत मराठा समाजाचं आंदोलन थंड पडलं होतं. या आंदोलनाला पुन्हा उभारी देण्याचा प्रयत्न समितीचा आहे. आता तो परिणाम मोर्चेकरी पुन्हा साधू शकतील का? आणि सरकार पुन्हा मोर्चामुळे दबावात येईल का याबाबत मात्र थोडीशी शंका आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा