मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनावर मोर्चेकरी समाधानी तर विरोधक नाराज

मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनावर मोर्चेकरी समाधानी तर विरोधक नाराज

या महामोर्चानंतर मराठा समाजाला लागलीच आरक्षण मिळालं नसलं तरी या निमित्ताने मोर्चेकरी मुख्यमंत्र्यांकडून काही महत्त्वाची आश्वासनं पदरात पाडून घेण्यात नक्कीच यशस्वी ठरलेत

  • Share this:

मुंबई, 9 ऑगस्ट : राज्याची राजधानी मुंबईतला मराठा समाजाच्या बहुचर्चित आणि प्रतिक्षित महामोर्चाची यशस्वी सांगता झाली. या महामोर्चानंतर मराठा समाजाला लागलीच आरक्षण मिळालं नसलं तरी या निमित्ताने मोर्चेकरी मुख्यमंत्र्यांकडून काही महत्त्वाची आश्वासनं पदरात पाडून घेण्यात नक्कीच यशस्वी ठरलेत. त्यामुळे या महामोर्चानंतर मोर्चेकरी समाधानी तर विरोधक नाराज असल्याचं चित्रं बघायला मिळालं.

मुख्यमंत्र्यांनी काय आश्वासनं दिली ?  

1. मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी मंत्रिमंडळाची उपसमितीची स्थापना करण्यात येणार आहे. या समितीला कॅबिनेटचा दर्जा असल्याने समितीच्या निर्णयाला मंत्रिमंडळाच्या मान्यतेचीही गरज राहणार नाहीये. मराठा आरक्षणासंबंधीचा अहवाल राज्य मागास आयोगाला सादर करण्यासाठी विहित कालावधीची मर्यादाही घालून देण्यात येणार आहे.

2. ओबीसींप्रमाणेच आता मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांनाही छत्रपती शाहू महाराज शिष्यवृत्ती योजनेचा लाभ मिळणार आहे. तसंच मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना 6 लाखांच्या ईबीसी मर्यादेसाठी 60 टक्के गुणांची अट 50 टक्क्यांवर आणली. 605 अभ्यासक्रमांमध्ये मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती सवलत मिळेल. यापूर्वी फक्त 35 अभ्यासक्रमांसाठीच मराठा समाजाला ही सवलत मिळत होती.

3. अण्णासाहेब पाटील महामंडळांमार्फत तीन लाख तरुणांना स्किल ट्रेनिंग मिळणार. तसंच दहा लाखांपर्यंत कर्ज विनाव्याद मिळणार

Loading...

4. प्रत्येक जिल्ह्यात मराठा विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह बांधण्यात येईल, त्यासाठी प्रत्येक जिल्ह्याला पाच कोटी मंजूर

5. बार्टीच्या धर्तीवर 'सारथी'चं सक्षमीकरण करण्यात येईल

6. कोपर्डीच्या प्रकरणाच्या खटल्याचं कामकाज अंतिम टप्प्यात आहे. आरोपींना शिक्षा व्हावी, यासाठी सरकार सर्वोतपरी प्रयत्न करणार

मुख्यमंत्र्यांची हीच आश्वासनं आंदोलकांच्या शिष्टमंडळाने पुन्हा आझाद मैदानावरच्या व्यासपीठावरून वाचून दाखवली. त्यानंतर मोर्चाची सांगता झाली. समारोपावेळी मराठा मोर्चाच्या व्यासपीठावर खासदार संभाजीराजे छत्रपती आणि नितेश राणेही उपस्थित होते. संभाजीराजेंनी यावेळी मोर्चेकऱ्यांना उद्देशून भाषणही केलं. मराठा मोर्चाच्या स्टेजवर नेत्यांनी चढण्याची ही पहिलीच वेळ होती. त्यामुळे मोर्चा समारोपावेळी का होईना पण नेते एकदाचे स्टेजवरच चढले असंच म्हणावं लागेल. मोर्चात यापूर्वीही अनेक दिग्गज नेते सहभागी झाले होते पण स्टेजवर अजूनतरी एकही नेता चढला नव्हता.

मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनांवर विरोधक नाराज

विधानसभेतही मराठा आरक्षणाचा मुद्दा गाजला. या प्रश्नावर विरोधकांनी मुख्यमंत्र्यांनी निवेदन करण्याची मागणी केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी शिष्टमंडळाला दिलेली आश्वासनंच पुन्हा वाचून दाखवली. मुख्यमंत्र्यांच्या या निवेदनावेळी विरोधकांनी 'गोल...गोल...'च्या घोषणा देऊन सरकारने मराठा समाजाच्या तोंडाला पुन्हा एकदा पानं पुसल्याचा आरोप केलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 9, 2017 04:29 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...