मुंबई, 13 जानेवारी: मुंबईतील गोवंडी परिसरात एका विवाहित महिलेच्या हत्येचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका तरुणानं आपल्या पत्नीला चालत्या ट्रेनमधून ढकलून दिलं आहे. या दुर्दैवी घटनेत पीडित महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे. ही सर्व घटना एका सहप्रवाशी महिलेनं पाहिल्यानं हे प्रकरण उघडकीस आलं आहे. संबंधित महिलेनं या घटनेची माहिती मानखुर्द पोलीस ठाण्यात दिली. त्यानंतर पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे.
अन्वर अली शेख असं या आरोपी पतीचं नाव आहे. एका महिन्यापूर्वी त्याचं लग्न पूनम चव्हाण या महिलेशी झालं होतं. पूनमचं हे दुसरं लग्न होतं. पूनमला तिच्या पहिल्या लग्नापासून तीन वर्षांची मुलगी देखील आहे. पूनमने दुसरं लग्न केल्यानंतर ती अन्वर शेखसोबत मानखुर्द येथील एका चाळीत राहत होती. सोमवारी तीनच्या सुमारास पूनम आणि अन्वर लोकलने प्रवास करत होते. यावेळी आरोपीनं आपल्या पत्नीला लोकलमधून ढकलून दिलं आहे.
यावेळी या जोडप्यासोबत प्रवास करणाऱ्या संगीता नावाच्या महिलेनं हा प्रकार पाहिला. त्यानंतर संगीता यांनी त्वरीत पोलीस स्टेशन गाठून संबंधित घटनेची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी तातडीनं कारवाई करत आरोपी पतीला बेड्या ठोकल्या आहेत. या घडलेल्या प्रकारानंतर आरोपी पळून जाण्याच्या तयारीत होता, अशीही माहिती समोर आली आहे. आरोपीनं ही हत्या का केली? याचं कारण अद्याप स्पष्ट झालं नसून पोलीस या घटनेचा तपास करत आहेत.
नेमका प्रकार कसा घडला?
प्रत्यक्षदर्शी महिलेनं दिलेल्या माहितीनुसार, 'ते दोघं पतीपत्नी लोकलने एकत्रित प्रवास करत होते. पत्नी दरवाज्याजवळच्या खांबाला लटकत प्रवास होती. काही वेळाने तिचा पती तिच्याजवळ आला आणि त्यानं तिला पाठीमागून मिठी मारल्यासारखं पकडलं. त्यामुळे आरोपी पतीच्या भरोशावर ती ट्रेनच्या बाहेर झुकली होती. पण नराधमाने अचानक मिठी सोडली. त्यामुळे ती महिला थेट ट्रेनमधून खाली पडली. ट्रेनही थोडी वेगात असल्यानं या महिलेचा घटनास्थळीचं मृत्यू झाला.'