डोंबिवली, 09 नोव्हेंबर : दोन दुचाकीस्वारांमध्ये वाद झाला आणि त्याचं रुपांतर हाणामारीपर्यंत गेलं. ही धक्कादायक घटना डोंबिवली परिसरात घडली आहे. उड्डाण पुलावर दोन दुचाकीस्वारांमध्ये झालेल्या वादातून तुफान हाणामारी झाली आहे. ही घटना रविवारी रात्री उशिरा घडली असून या हाणामारीचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
डोंबिवलमधील कोपर ब्रिजचे काम चालू असल्याने सगळ्या गाड्या या ठाकुर्ली इथल्या ब्रिजवरून वळवण्यात आल्या आहेत. हा ब्रिज छोटा असल्यानं इथे बरेच अपघात होत असतात. रविवारी रात्री 10 च्या सुमारास दुचाकीस्वार जात असताना दुसऱ्या दुचाकीस्वाराचा धक्का लागला. या छोट्या अपघातातून दोघांमध्ये वाद झाला. हा वाद तू-तू मैं-मैं वरून शिवीगाळ आणि त्यानंतर कॉलर पकडण्यापर्यंत गेला.
दोन दुचाकीचालकांमध्ये बाचाबाची झाली आणि त्याचं रुपांतर हाणामारीत झालं. दरम्याम पलिकडून काही लोकांनी ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद करून त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. यात काही जणांनी मारहाण करण्याऱ्या दोन व्यक्तींना थांबवायचा प्रयत्न केला मात्र ते त्या दुसऱ्या व्यक्तीला मारतच होते. ही घटना रात्रीच्या 10 सुमारास घडली असून अश्या घटना या ब्रिजवर वारंवार होत असल्याचं निदर्शनास आल्यानं पोलीसांची गस्त वाढवण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे.