मखर निर्मितीतून महिलांना मिळाला हक्काचा रोजगार

मखर निर्मितीतून महिलांना मिळाला हक्काचा रोजगार

डोंबिवलीत महिलांकडून चटईपासून मखरांची निर्मिती केली जातेय. पर्यावरणस्नेही असलेल्या या मखरांना बाजारात मोठी मागणी असून यामुळे महिलांना हक्काचा रोजगारही उपलब्ध झालाय.

  • Share this:

प्रदिप भणगे, डोंबिवली, 30 ऑगस्ट : राज्य सरकारनं यंदाच्या वर्षीपासून थर्माकोलवर बंदी घातली असून त्यामुळे गणेशोत्सवात सजावट काय करायची? असा प्रश्न अनेकांना पडलाय. मात्र याला पर्याय म्हणून डोंबिवलीत महिलांकडून चटईपासून मखरांची निर्मिती केली जातेय. पर्यावरणस्नेही असलेल्या या मखरांना बाजारात मोठी मागणी असून यामुळे महिलांना हक्काचा रोजगारही उपलब्ध झालाय.

थर्माकोलच्या मखरांवर राज्य सरकारनं बंदी घातलीये. त्यामुळे यंदा सजावट काय करावी? या प्रश्नाचं उत्तर शोधून काढलंय डोंबिवलीच्या माधवी पंधरे यांनी. माधवी यांनी थर्माकोलच्या मखरांना पर्याय म्हणून चटईच्या मखरांची निर्मिती सुरू केली. सात वर्षांपूर्वी घराला हातभार लावण्याच्या उद्देशानं सुरु केलेल्या या व्यवसायाला यंदा चांगलीच मागणी आहे.

माधवी यांचे पती विजय हे त्यांना या कामात मोठी मदत करतात. मखर तयार करण्यासाठी खास आसाम राज्यातून बांबूपासून तयार केलेली चटई मागवली जाते. त्याला लाकडी पट्ट्या जोडून हवे तसे आकार देत आकर्षक अशा मखरांची निर्मिती केली जाते. यासाठी माधवी यांनी डोंबिवलीच्या आजदे गावात छोटेखानी कारखाना उभारला असून त्यात जवळपास २५ कामगार काम करतात. विशेष म्हणजे यातील बहुतेक कामगार महिला आहेत. या महिलांना कामाच्या कुठल्याही वेळा ठरवून दिलेल्या नसून घरच्या जबाबदाऱ्या उरकून त्या कामाला येतात आणि आवडीनं काम करतात. त्यामुळे या महिलांना मोकळ्या वातावरणात हक्काचा रोजगार उपलब्ध झालाय.

गेली सात वर्ष ४०० ते ५०० मखरांची विक्री करणाऱ्या माधवी यांना यंदा तब्बल अडीच हजार मखरांची मागणी आलीये. पुढच्या वर्षी ५ हजार मखर निर्मितीचं उद्दिष्ट त्यांनी ठेवलं असून यातून महिलांना रोजगारही मिळणार आहे. त्यामुळे राज्य सरकारच्या निर्णयाचा डोंबिवलीकर महिलांना मोठा फायदा झाल्याचं पाहायला मिळत असून पर्यावरणाचंही रक्षण होतंय.

पर्याय उपलब्ध नसल्यानं म्हणा, किंवा ग्राहकांना पर्यावरणाचं महत्त्व पटल्यामुळे म्हणा, माधवी यांच्या मखरांना यंदा मोठी मागणी आहे. त्यांनी हा व्यवसाय सुरू केला. पण यंदा राज्य सरकारनं थर्माकोलच्या वापरावर बंदी घातल्याने माधवी यांच्या मखरांना मोठी मागणी आहे.

 PHOTOS : बोल्ड अवतारात श्रद्धा कपूर पोचली 'स्त्री'च्या प्रमोशनला!

First published: August 30, 2018, 8:30 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading