Home /News /mumbai /

20 टक्के वीज दरवाढीचा 'शॉक', या तारखेपासून लागू होणार नवे दर

20 टक्के वीज दरवाढीचा 'शॉक', या तारखेपासून लागू होणार नवे दर

नव्या वर्षात घरगुती गॅस, पेट्रोल-डिझेलपाठोपाठ आता महावितरणही वीजदरवाढीचा झटका देणार आहे.

    मुंबई,16 जानेवारी: नव्या वर्षात घरगुती गॅस, पेट्रोल-डिझेलपाठोपाठ आता महावितरणही वीजदरवाढीचा झटका देणार आहे. महावितरणने 20 टक्के दरवाढीचा प्रस्ताव वीज नियामक आयोगाकडे (MERC) सादर केला आहे. वार्षिक तोटा भरुन काढण्यासाठी दरवाढीचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. वीज दरवाढ मंजूर झाल्यास ग्राहकांचे आर्थिक गणित कोलमडण्याची शक्यता नाकारता येत नाही. सर्वाधिक दरवाढीचा प्रस्ताव घरगुती आणि व्यापारी ग्राहकांसाठी ग्राहकांच्या हरकतींवर सुनावणी होऊन 1 एप्रिल 2020 पासून प्रस्तावित वीज दरवाढ लागू होणार आहे. मुंबईतील पूर्व उपनगरांसह संपूर्ण राज्यभरात वीजपुरवठा करणाऱ्या महावितरणने 5927 कोटी रुपयांच्या वीज दरवाढीचा प्रस्ताव राज्य वीज नियामक आयोगाकडे दाखल केला आहे. राज्यातील सुमारे दोन कोटी 55 लाख वीजग्राहकांना या दरवाढीचा फटका बसणार असून दरमहा 100 युनिटपर्यंत वीज वापरणाऱ्या सामान्य घरगुती ग्राहकांचा वीजदर हा 8 टक्क्यांनी वाढवण्याची शिफारस करण्यात आली आहे. 300 युनिटपेक्षा अधिक वीज वापरणाऱ्या ग्राहकांना मात्र दरवाढीतून वगळण्याची मागणी महावितरणने केली आहे. त्यामुळे घरगुती ग्राहकांसह व्यापाऱ्यांनाही या दरवाढीचा फटका बसणार आहे. दरम्यान, डिसेंबर महिन्यात महागाईचा दर 7.35 टक्क्यांवर गेला. यात भाजीपाल्याच्या किमती गतवर्षीच्या तुलनेत 60 टक्के वाढल्या असून खाद्यपदार्थांच्या किमतीत 14.22 टक्के वाढ झाली आहे. त्यापाठोपाठ एप्रिल 2020 पासूनच्या या वीज दरवाढीमुळे सामान्य माणसाचे बजेट कोलमडणार आहे. पाच वर्षांच्या काळात वीज ग्राहकांकडून 60 हजार 313 कोटी रुपये वसूल करण्याचा महावितरणचा उद्देश आहे. राज्य वीज नियामक आयोगाच्या बहुवार्षिक वीजदर पद्धतीनुसार इतर वीजवितरण कंपन्यांसह महावितरणनेही आता 2020 ते 2025 या पाच वर्षांच्या काळासाठी वीजदरवाढीचा प्रस्ताव आयोगाकडे दाखल केला. एप्रिल 2020 ते मार्च 2021 या काळासाठी 5.80 टक्के, 2021-22 मध्ये 3.25 टक्के, 2022-23 मध्ये 2.93 टक्के, 2023-24 मध्ये 2.61 टक्के तर 2024-25 मध्ये 2.54 वीजदरवाढीचा प्रस्ताव महावितरणने दाखल केला आहे. फेब्रुवारी महिन्यात राज्यातील सर्व महसुली मुख्यालयांच्या शहरांत महावितरणच्या प्रस्तावावर सुनावणी होईल. त्यात ग्राहक संघटनांना व इतरांना हरकती घेता येतील. सध्या किती मिळतो महसूल.. सध्याच्या वीजदरातून महावितरणला 76 हजार 998 कोटी रुपयांचा महसूल मिळतो. नवीन वीजदर लागू झाल्यानंतर 82 हजार 925 कोटी रुपयांचा महसूल अपेक्षित असून ही दरवाढ 5927 कोटी रुपयांची म्हणजेच सरासरी 5.80 टक्के असेल. त्यामुळे आता राज्य वीज नियामक आयोग प्रत्यक्षात किती दरवाढ मंजूर करतो याकडे लक्ष असणार आहे.
    Published by:Sandip Parolekar
    First published:

    पुढील बातम्या