सिंधुदुर्ग,20 डिसेंबर: नारायण राणे आणि दीपक केसरकर यांच्यातलं राजकीय वैर आणखीच वाढलं आहे. अशातच येत्या 29 डिसेंबरला सावंतवाडी नगराध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे. त्यामुळे साहजिकच याही निवडणुकीत केसरकर आणि राणे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
राज्यात महाविकास आघाडीने सत्ता स्थापन केल्यानंतर सावंतवाडीतही नगराध्यक्ष उमेदवारीबाबत तिन्ही पक्षांकडून एकच उमेदवार असणे गरजेचे होते. त्यादृष्टीने शिवसेनेच्या उमेदवारीवर तिन्ही पक्षांच्या वरीष्ठ नेत्यांचे एकमत झाले. पण या नेत्यांच्या बैठकीआधी कॉंग्रेसच्या दिलीप नार्वेकराना पक्षाचा एबी फॉर्म देण्यात आलेला होता. या फॉर्मबाबत आपल्याला पक्षाकडून काहीही कल्पना न देता तो नार्वेकराना परस्पर देण्यात आला असल्याचा आरोप काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष विकास सावंत यांनी केला आहे. तसंच पक्षाचा एबी फॉर्म जरी दिला असला तरीही पक्षाने उमेदवारी मागे घेण्यास सांगितल्यानंतर नार्वेकरानी आपली उमेदवारी मागे घेणे आवश्यक होते, परंतु आपली उमेदवारी त्यांनी कायम ठेवली. उलट प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांची स्वाक्षरी असलेले शुभेच्छापत्र नार्वेकर यांनी व्हायरल केले आहे. त्यामुळे सावंतवाडी नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपासोबतच महाविकास आघाडीतही फूट पडली आहे. नार्वेकर यांनी व्हायरल केलेले बाळासाहेब थोरात यांचे पत्र संशयास्पद असल्याचा दावा जिल्हाध्यक्ष विकास सावंत यांनी केला आहे.
काय आहे बाळासाहेब थोरातांच्या पत्राचे गौडबंगाल?
सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष विकास सावंत यांच्याशी 'News 18 लोकमत'ने संपर्क साधला असता सावंत यांच्या म्हणण्यानुसार महाविकास आघाडीच्या ज्येष्ठ नेत्यांमध्ये 15 डिसेंबरला बैठक झाली. या बैठकीत महाविकास आघाडीकडून दीपक केसरकर यांचे कार्यकर्ते आणि शिवसेनेचे नगरसेवक असलेल्या बाबू कुडतरकर यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब करण्यात आला. त्यानुसार नार्वेकर यांनी आपली उमेदवारी मागे घ्यावी, असा निरोप पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी नार्वेकरांना दिला. 18 डिसेंबर ही तारीख उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख होती. मात्र, नार्वेकरांनी काँग्रेसचा एबी फॉर्म असलेला आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवला आणि आपले उमेदवारी अधिकृत आहे. हे दाखवण्यासाठी 18 डिसेंबरला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या स्वाक्षरीचे शुभेच्छापत्र व्हायरल केले. सावंत यांच्या म्हणण्यानुसार हे पत्र त्यांना संशयास्पद वाटत आहे. याचे कारण असं राजकीय पत्र महाराष्ट्र शासनाचा मंत्री म्हणून वापरण्यात असलेल्या लेटरहेडवर देता येत नाही. दुसरा या पत्रातला महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या पत्रावर बाळासाहेब थोरात यांची मराठीतली स्वाक्षरी आहे. सावंत यांच्या म्हणण्यानुसार बाळासाहेब थोरात मराठीतून स्वाक्षरी न करता नेहमी इंग्रजीतूनच स्वाक्षरी करतात. तिसरा या पत्राबाबत आणखी एक मुद्दा म्हणजे हे पत्र ज्या तारखेला म्हणजे 18 डिसेंबरला नार्वेकर यांना देण्यात आले, त्यादिवशी बाळासाहेब थोरात नागपूरला होते आणि हे पत्र त्यांच्या संगमनेर येथील कार्यालयाकडून देण्यात आले आहे.
सावंत म्हणाले की, बाळासाहेब थोरात नागपूरला असतील तर संगमनेरच्या कार्यालयातून देण्यात आलेल्या पत्रावर बाळासाहेब थोरात यांची स्वाक्षरी कशी काय असू शकेल? असे अनेक मुद्दे उपस्थित करत जिल्हाध्यक्ष सावंत यांनी घडलेला सर्व प्रकार काँग्रेस प्रदेशाध्यक्षांना कळवला आहे. त्यानुसार काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी सावंत यांना सर्वप्रकारची शहानिशा करून याबाबतचा एक अहवाल प्रदेश कार्यालयाकडे पाठवण्यास सांगितले आहे. सावंत यांनी हा अहवाल तयार केला असून तो त्यांनी प्रदेश कार्यालयाकडे पाठवला आहे. मात्र या सगळ्यात महाविकास आघाडीत म्हणजेच काँग्रेस पक्षात फूट पडली असून याचा फायदा नारायण राणेंना होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.