'कर्ज फिटलं साहेब, आता लेकीच्या लग्नाला या..!'

'कर्ज फिटलं साहेब, आता लेकीच्या लग्नाला या..!'

महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजनेचा लाभ देण्याचा शुभारंभ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आज पार पडला.

  • Share this:

मुंबई, 24 फेब्रुवारी : 'साहेब, कर्जमुक्तीची रक्कम जमा होणार असल्याने आता मुलीच्या लग्नाची चिंता नाही...तुम्हीही लग्नाला या..', असं आपुलकीचं आमंत्रण परभणी जिल्ह्यातल्या विठ्ठलराव गरूड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिलं. तर पहिल्यांदा  कर्जमुक्तीसाठी हेलपाटे मारावे लागले नाही अशी भावना अहमदनगर जिल्ह्यातल्या पोपट मुकटे या शेतकऱ्याने मुख्यमंत्र्यांजवळ व्यक्त केली.

महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजनेचा लाभ देण्याचा शुभारंभ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आज पार पडला. त्यानिमित्त परभणी, अहमदनगर आणि अमरावती जिल्ह्यातील लाभार्थी शेतकऱ्यांशी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. यावेळी पात्र, शेतकऱ्यांची पहिली यादी प्रसिद्ध करण्यात आली. विधानभवनात झालेल्या या कार्यक्रमास महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, कृषी मंत्री  दादाजी भुसे, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, माजी मंत्री दिवाकर रावते, मुख्य सचिव अजोय मेहता आदी उपस्थित होते.

हेलपाटे मारावे लागले का?

या योजनेचा लाभ घेताना काही त्रास झाला का? किती हेलपाटे मारावे लागले, किती कर्ज होते, कुठल्या पीकाला कर्ज घेतले होते. आधीच्या आणि आताच्या कर्जमुक्ती योजनेमध्ये काय फरक जाणवला असे प्रश्न मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी लाभार्ध्यांना विचारली. त्यावर योजनेबाबत शंभर टक्के समाधानी असल्याची भावना अहमदनगर जिल्ह्यातील पोपट मुकटे यांनी व्यक्त करताना ‘मागील वेळेस पाच ते सहा वेळा चकरा माराव्या लागल्या यावेळी केवळ एका नंबरवरच काम झाले’असं त्यांनी सांगितलं.

लेकीला आणि जावयाला लग्नाच्या शुभेच्छा

परभणीच्या पिंगळी येथील विठ्ठलराव गरूड यांनी कर्जमुक्तीची रक्कम मिळणार असल्यानं चिंता मिटल्याची भावना व्यक्त केली आणि मुलीच लग्न जमलंय अशी आनंदाची बातमी त्यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना दिली. त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी, 'मुलीला कुठं दिलंय' अशी आपुलकीची विचारपूस करतानाच लेकीला आणि जावयाला लग्नाच्या शुभेच्छाही दिल्या. हा संवाद ऐकताना हरकून गेलेल्या विठ्ठलराव यांनी लगोलग मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना मुलीच्या लग्नाचे आमंत्रणही दिले.

योजनेच्या यशाचे श्रेय यंत्रणेला- मुख्यमंत्री

यावेळी मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, 'राज्यातील बळीराजांना कर्जमुक्तीतून चिंतामुक्त करणाऱ्या या मोठ्या योजनेची अंमलबजावणी केवळ ६० दिवसात झाली असे सांगून याचे श्रेय यंत्रणेला असल्याचं त्यांनी सांगितलं. ही योजना राबवितांना आपण शेतकऱ्यांवर काही उपकार करीत आहोत अशी भावना ठेवू नका. शेतकऱ्यांचे आशिर्वाद आपण या माध्यमातून घेत आहोत. त्यामुळे आपण लाभार्थी आहोत, असं मुख्यमंत्री यावेळी म्हणालं. काही ठिकाणी अमंलबजावणी करताना उणिवा जाणवल्या तर शेतकऱ्यांनी नाराज होवू नये, असे सांगतानाच शेतकऱ्यांचे प्रश्न समजून घेताना संमय ढळू देूऊ नका, बळीराजाला दुखवु नका, अशी सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यंत्रणेला केली.

कर्जमुक्त होऊन बळीराजाला काळ्या आईची सेवा करता यावी यासाठी योजना- उपमुख्यमंत्री

यावेळी अजित पवार म्हणाले की, 'बळीराजा कर्जमुक्त व्हावा यासाठी आमचा प्रयत्न आहे. त्याच भावनेतून ही योजना सुरू केली. कर्जमुक्त होऊन शेतकऱ्याला पुन्हा काळ्या आईची सेवा करता यावी. शेतीतून चांगले उत्पादन घेता यावे यासाठी राज्य शासनाने ही महत्वाकांक्षी योजना आणली. शेतकरी आनंदात राहवा त्याच्या मुलांचं शिक्षण चांगल्या पद्धतीने व्हावं, अशी आमची भूमिका असल्याचं त्यांनी सांगितलं.

३५ दिवसांमध्ये ३५ लाख कर्ज खात्यांची माहिती गोळा

यावेळी अमरावती येथील सुरेश कोटेकर, सरीता गाढवे, बाबाराव दामोदर यांच्याशीही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी संवाद साधला. योजनेंतर्गत ३४ लाख ८३ हजार ९०८ शेतकरी खात्यांची माहिती प्राप्त झाली आहे. आज १५ हजार ३५८ शतकऱ्यांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. योजनेंतर्गत ३५ दिवसांमध्ये ३५ लाख कर्ज खात्यांची माहिती गोळा करण्यात आली आहे. तसंच १५ दिवसांच्या आत या माहितीचे लेखापरिक्षण झाले आहे. ही योजनेची सर्व अमंलबजावणी संगणकीय पद्धतीने होत आहे. शेतकऱ्यांच्या मान्यतेनंतरच कर्जमुक्तीची रक्कम खात्यात जमा होणार आहे. आधार प्रमाणीकरणानंतर शेतकऱ्याला नोंद पावती दिली जात आहे.

First published: February 24, 2020, 6:32 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading