मुंबई 9 नोव्हेंबर: सर्वात मोठा सण असणारी दिवाळी (Diwali) आता काही दिवसांवर आली आहे. त्यामुळे बाजारपेठा ओसंडून वाहत आहे. राज्यातल्या कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्याने या गर्दीने राज्य सरकारची चिंता वाढली आहे. सोमवारी (9 नोव्हेंबर) राज्यात 3,277 रुग्णांची भर पडली त्यामुळे रुग्णांचा एकूण आकडा हा 17,23,135 एवढा झाला आहे. तर दिवसभरात 65 जणांचा मृत्यू झाला. राज्य सरकारचं कोविड पोर्टल हे काही तांत्रिक कारणामुळे बंद असल्याने बरे झालेल्या रुग्णांची संख्या कळू शकली नाही.
मुंबईत 507 रुग्ण बरे झाले त्यामुळे कोरोनामुक्त रुग्णांची संख्या ही 2,37,029 एवढी झाला आहे. तर Recovery Rate 90 टक्क्यांवर गेला आहे. तर रुग्ण दुप्पट होण्याचे दिवस हे 229 वर गेले आहेत.
कोरोना (Coronavirus) जगात येऊन आता एक वर्ष पूर्ण होणार आहे. गेल्या वर्षी चीनच्या वुहानमध्ये याच महिन्याच्या 17 तारखेला 55 वर्षीय महिलेला कोरोना संसर्ग झाल्याचे निदान झाले होते. यानंतर हळूहळू कोरोना संपूर्ण जगात पसरला. आतापर्यंत जगभरात 50 कोटींहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. 12 लाख 57 हजारांहून अधिक लोकांचा जीव गेला आहे.
भारतात कोरोना रुग्णांची संख्या 85 लाखांच्या पुढे गेली आहे. यात आतापर्यंत एक लाख 26 हजार 611 लोकांनी आपला जीव गमावला आहे. covid-19 ची दुसरी लाट जगातल्या अनेक देशांमध्ये आली आहे आणि भारतातसुद्धा दिल्ली, केरळ यासारख्या राज्यांत आता कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अनेक जणांना लागण होत आहे.
दिल्लीच्या काही भागात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबद्दलही बोलले जात आहे. तसेच जगात फ्रान्स, ब्रिटन आणि अमेरिका हे देश कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला सामोरे जात आहेत. यामुळे बऱ्याच देशांनी पुन्हा लॉकडाउनचा निर्णय घेतला आहे. अशा परिस्थितीत कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर कोरोना संपुष्टात येईल की कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला आपल्याला सामोरे जावे लागणार आहे हा प्रश्न आता सर्वांनाच पडला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.