मुंबई, 16 नोव्हेंबर : काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेची राज्यपालांसोबतची नियोजित भेट रद्द करण्यात आली आहे. तर दुसरीकडे एनडीएच्या बैठकीलाही शिवसेना गैरहजर राहणार आहे. त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत जाण्याबाबत शिवसेना संभ्रमात आहे का? असा सवाल आता विचारला जात आहे.
शिवसेनेनं काँग्रेस राष्ट्रवादीच्या मदतीनं राज्यात सत्ता स्थापनेची जुळवाजुळव सुरू केली असली तरी सेनेचं नेमकं चाललंय तरी काय? असा प्रश्न सर्वसामान्याना पडला आहे. लोकसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर रविवारी एनडीएची बैठक आयोजित करण्यात आली आहे. मात्र, या बैठकीला न जाण्याचा निर्णय शिवसेनेनं घेतला आहे.
'एनडीएची बैठक ही काही पक्षप्रमुखांची नव्हती. संसदेचं अधिवेशन सुरू होण्याआधी 48 तासांआधी एनडीएच्या घटकपक्षांची बैठक होत असते. सध्या राज्यात राजकीय परिस्थितीत पाहात बरीच धावपळ सुरू आहे. त्याआधीही अरविंद सावंत यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. त्यानंतर एनडीएच्या या बैठकीबद्दल शिवसेनेला निमंत्रण मिळालं नाही. पण, पत्र मिळालं नसलं तरी हरकत नाही. याआधीच आमचा बैठकीला न जाण्याचा निर्णय झाला होता', असा खुलासा सेनेचे खासदार राऊत यांनी केला.
एकीकडे सेनेनं एनडीएच्या बैठकीपासून चार हात दूर राहण्याचा निर्णय घेतला. तर दुसरीकडे काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत राज्यपालांच्या नियोजित भेटलाही सेनेनं खोडा घातला आहे.
खरंतर मुख्यमंत्रिपदाच्या मुद्द्यावरुन सेनेचे अरविंद सावंत यांनी केंद्रीय अवजड उद्योग मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. आता राज्यसभेत शिवसेना खासदारांची विरोधी बाकांवर बसण्याची व्यवस्था करून भाजपनं त्याची परतफेड केली आहे.
शिवसेनेनं काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मदतीनं राज्यात सत्ता स्थापनेसाठी चंग बांधला असला तरी, सत्तेच्या सारीपाटावर शिवसेना गोंधळल्याचं चित्र आहे.
राष्ट्रवादीची पुण्यात बैठक
रविवारी पुण्यात शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोअर कमिटीची दुपारी 4 वाजता बैठक होणार आहे. या बैठकीला राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, छगन भुजबळ, जयंत पाटील हे हजर राहणार आहे. गेल्या काही दिवसांपासून शिवसेना आणि काँग्रेस नेत्यांसोबत सरकार स्थापन करण्याबद्दल बैठका पार पडल्या. त्यानंतर राष्ट्रवादीची स्वतंत्र बैठक होत आहे.
सोनिया गांधी-शरद पवारांची बैठक पुढे ढकलली
दरम्यान, उद्या रविवारी नवी दिल्लीत शरद पवार आणि सोनिया गांधी यांची महत्त्वाची बैठक होणार असं सांगण्यात आलं होतं. परंतु, ही बैठक पुढे ढकलण्यात आल्याचं वृत्त आहे. किमान समान कार्यक्रमावर पक्षश्रेष्ठींनी शिक्कामोर्तब केल्यानंतरच सेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नव्या आघाडीची गाडी पुढे जाणार आहे.
=============================
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा