SPECIAL REPORT : सत्ता स्थापन होण्याआधीच शिवसेनेच्या नव्या शिलेदारांनी थोपटले दंड?

SPECIAL REPORT : सत्ता स्थापन होण्याआधीच शिवसेनेच्या नव्या शिलेदारांनी थोपटले दंड?

'मातोश्री'वर आज शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत सर्व नवनिर्वाचित आमदारांची बैठक झाली.

  • Share this:

उदय जाधव, प्रतिनिधी

मुंबई, 26 ऑक्टोबर : 'मातोश्री'वर आज शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत सर्व नवनिर्वाचित आमदारांची बैठक झाली. या बैठकीत विधान परिषद आमदारांच्या विरोधात निवडून आलेल्या आमदारांनी दंड थोपटले. कारण, मंत्रिमंडळात मागच्या दाराने प्रवेश करणाऱ्यांना स्थान देण्याऐवजी जनतेने निवडून दिलेल्या आमदारांना स्थान द्यावं, अशी मागणी शिवसेनेत जोर पकडू लागली आहे.

शिवसेनेच्या नवनिर्वाचित आमदारांची आज 'मातोश्री'वर बैठक झाली. या बैठकीत सत्ता स्थापन झाल्यावर मंत्रिमंडळात जनतेने निवडून दिलेल्या आमदारांनाच स्थान देण्यात यावं अशी मागणी करण्यात आली. कारण, आधीच्या सरकारमध्ये तब्बल ६ मंत्री विधान परिषदेतील होते. ज्यामुळे जनतेमधून निवडून आलेले आमदार नाराज होते.

इतके की तीन वर्षांपूर्वी याच प्रश्नावर मोठी गंभीर परिस्थिती निर्माण झाली होती. त्यावेळी 'मातोश्री'वर झालेल्या बैठकीत शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी कशीबशी समजूत काढून नाराज आमदारांना शांत केलं होतं. त्यावेळची ठिणगी अजूनही काही आमदारांच्या मनात सलतेय.

त्यामुळे यावेळी सत्ता स्थापन करण्यापूर्वीच, निवडून आलेल्या आमदारांनी होणाऱ्या मंत्रिमंडळात स्थान मिळवण्यासाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. या संदर्भात कॅमेऱ्यासमोर कुणी आमदार बोलत नसले तरी त्यांच्या मनातील सल त्यांनी ऑफ कॅमेऱ्यावर मात्र बोलून दाखवली.

मंत्री बनलेले विधान परिषद आमदार

१) सुभाष देसाई

२) दिवाकर रावते

३) रामदास कदम

४) डाँ. दिपक सावंत

५) तानाजी सावंत

६) जयदत्त क्षीरसागर

शिवसेनेनं मुख्यमंत्री म्हणून युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांचाच चेहरा पुढे आणला आहे. त्यामुळे होणाऱ्या मंत्री मंडळात टीम आदित्यमध्ये जनतेने निवडलेले लोकप्रतिनिधीच दिसतील अशी शक्यता निर्माण झाली आहे. तसंच जे विधान परिषदेतील आमदार आहेत त्यांना पक्ष बांधणीची जबाबदारी मिळू शकते अशी शक्यता सूत्रांनी व्यक्तं केली.

लोकनियुक्त आमदारांच्या मागण्यांवर आता उद्धव ठाकरे काय निर्णय घेतायेत याकडेच आता शिवसेनेच्या लोकनियुक्त आमदारांचं लक्षं लागलं आहे.

==================

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 26, 2019 10:08 PM IST

ताज्या बातम्या