SPECIAL REPORT : महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा ठरवण्यासाठी उद्याचा दिवस आहे महत्त्वाचा!

सत्तेच्या या रणसंग्रामात पुरेसं संख्याबळ नसतानाही काँग्रेस राष्ट्रवादीनं मोर्चेबांधणी सुरू केली आहे. तर दुसरीकडे संख्याबळ असणाऱ्या शिवसेना-भाजपमधला वाद शमवण्यासाठी संकटमोचकच उरलेले नाहीत.

News18 Lokmat | Updated On: Nov 3, 2019 09:16 PM IST

SPECIAL REPORT : महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा ठरवण्यासाठी उद्याचा दिवस आहे महत्त्वाचा!

मुंबई, 03 नोव्हेंबर : नव्या सरकारच्या पाच वर्षांच्या कारभाराची पायाभरणी 4 नोव्हेंबरला होणार आहे. 4 तारीख आगामी 5 वर्षाच्या सरकारचं भवितव्य ठरवणार आहे. त्यामुळे सोमवारी मुंबईत घडणाऱ्या राजकीय घडामोडींकडे देशाचं लक्ष लागलंय. त्यातच महायुतीत दुवा साधणारे संकटमोचक नसल्यानं दोन्ही पक्षात कमालीचा तणाव निर्माण झाल्याचं स्पष्ट होतंय.

निवडणुकीचा निकाल लागून दहा दिवस उलटले आहे. मात्र, निवडणूक एकत्रित लढलेल्या शिवसेना भाजपची तोंडं वेगवेगळ्या दिशेला झाल्यानं तिढा वाढलाय. तर दुसरीकडे दोन बडे नेते 4 तारखेला दिल्लीत पोहोचत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी थायलंड दौऱ्याहून मायदेशी पोहोचत आहेत. तर शरद पवार दिल्लीत सोनिया गांधींची भेट घेणार आहेत. राज्यात राजकीय धुरळा उडालेला असतानाच शरद पवार मुख्यमंत्री होणार, अशी चर्चा सुरू झाल्यानं नवा ट्विस्ट आला.

सत्तेच्या या रणसंग्रामात पुरेसं संख्याबळ नसतानाही काँग्रेस राष्ट्रवादीनं मोर्चेबांधणी सुरू केली आहे. तर दुसरीकडे संख्याबळ असणाऱ्या शिवसेना-भाजपमधला वाद शमवण्यासाठी संकटमोचकच उरलेले नाहीत. प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे आणि भय्यू महाराज हयात नाहीत. प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडेंचा बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरेंशी थेट संपर्क होता. या नेत्यांमध्ये जिव्हाळा आणि विश्वास होता. भय्यू महाराजही सर्व पक्षांच्या नेत्यांसोबत संवाद साधायचे. खुद्द भय्यू महाराजांनी काही महिन्यांपूर्वी न्यूज18 लोकमतचे संपादक महेश म्हात्रे यांना दिलेल्या मुलाखतीत याची कबुली दिली होती.

महायुतीत कोणीही संकटमोचक नसलं तरी सिंगल लार्जेस्ट पार्टी असल्यानं भाजपचं पारडं जड आहे. महाराष्ट्र हे दक्षिणेचं प्रवेशद्वार आहे. सर्व देशभरात आपली ताकद दाखवून दिलेल्या भाजपला दक्षिण दिग्विजय मिळवायचाय. कर्नाटकमध्ये डी. के. शिवकुमार या बाहुबली नेत्याला निष्प्रभ करून, सत्ता मिळवत भाजपनं त्यांचे इरादे आधीच स्पष्ट केले.

Loading...

ईडीनं शरद पवारांना पाठवलेली नोटीस म्हणजे दु:साहस दाखवणाऱ्या नेत्यांसाठी दिलेला स्पष्ट इशारा होता. हे सर्व इशारे लक्षात घेता, भाजप तडजोड करण्याच्या मनस्थितीत नसल्याचं स्पष्ट होतंय.

आणि विशेष म्हणजे, महाराष्ट्रातही सिंगल लार्जेस्ट पार्टी असल्यानं भाजपला सरकार स्थापन करण्यात कोणतीच अडचण येणार नसल्याचं कायदेतज्ज्ञांनी सांगितलं आहे.

चार तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदी थायलंड दौऱ्याहून परतणार आहेत. मोदींचं मायदेशी आगमन झाल्यानंतर सत्तेचे फासे वेगानं भाजपच्या दिशेनं पडायला लागतील यात शंका नाही. देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी झाला तर शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसमधले नाराज आणि सत्तेत सहभागी होण्यासाठी इच्छुक असलेले आमदार मोठ्या संख्येनं पक्षांतर करण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे. एकंदरीतच आता चार तारखेला सत्ता स्थापनेचं राजकारण अंतिम निष्कर्षापर्यंत पोहोचणार हे नक्की.

===========================

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 3, 2019 09:16 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...