राज्याच्या राजकारणाचा नवा अंक, देवेंद्र फडणवीस यांची आता अग्निपरीक्षा!

जर फडणवीस यांनी बहुमत सिद्ध केलं नाहीतर त्यानंतर दुसऱ्या मोठा पक्षाला सरकार स्थापन करण्यासाठी आमंत्रण दिलं जाईल.

News18 Lokmat | Updated On: Nov 9, 2019 08:55 PM IST

राज्याच्या राजकारणाचा नवा अंक, देवेंद्र फडणवीस यांची आता अग्निपरीक्षा!

मुंबई, 09 नोव्हेंबर : शिवसेना आणि भाजपमध्ये सत्ता स्थापनेसाठी वाद विकोपाला गेला आहे. आता राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी भाजपला सत्ता स्थापनेसाठी आमंत्रण दिलं आहे. आता फडणवीस यांची अग्निपरीक्षा असून त्यांना बहुमताचा जादुई आकडा सिद्ध करावा लागणार आहे.

विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेना आणि भाजपमध्ये संबंध कमालीचे ताणले गेले. भाजपला 105 तर शिवसेनेला 56 जागा मिळाल्या. परंतु, दोन्ही पक्षांमध्ये मुख्यमंत्रिपदावरून जोरदार रस्सीखेच पाहण्यास मिळाली. अखेर शुक्रवारी 8 नोव्हेंबर रोजी 13 व्या विधानसभेचा कार्यकाळ संपुष्टात आला पण भाजपला सरकार स्थापन करता आले नाही. देवेंद्र फडणवीस यांनीही सरकार स्थापन करण्यास असमर्थता दाखवत आपल्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. तुर्तास काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांची राज्यपालांनी नियुक्ती केली आहे.

सत्ता स्थापनेच्या प्रक्रियेप्रमाणे राज्यपालांनी सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपला सरकार स्थापन करण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांना आमंत्रण दिलं आहे. राज्यपालांनी आमंत्रण दिल्यामुळे फडणवीस यांना आपल्याकडे बहुमतासाठी किती आमदार आहे, किती जणांचा पाठिंबा आहे, असं सांगावं लागणार आहे. त्यानंतर बहुमत सिद्ध करावे लागणार आहे.

परंतु, गेल्या 15 दिवसांमध्ये भाजप आणि शिवसेनेमध्ये संबंध कमालीचे ताणले गेले आहे. शिवसेना मुख्यमंत्रिपदाच्या मागणीवर ठाम आहे. तर दिल्लीतली भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांनीही फडणवीसच हे मुख्यमंत्री होतील असं शिक्कामोर्तब केलं आहे. त्यामुळे भाजप मुख्यमंत्रिपदावरुन कोणतीही तडजोड करायला तयार नाही. अखेरीस हा वाद आरोप आणि प्रत्यारोपांवर आला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी तर, 'युती तोडायची की नाही सेनेनं ठरवावं' असंच जाहीर करून टाकलं. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनीही, मुख्यमंत्रिपदाबाबत ठरलं होतं आणि मी बाळासाहेबांना वचन दिलं ते पूर्ण करणारच, अशी आक्रमक भूमिका घेतली आहे. परंतु, भाजपने चर्चेचा पर्याय अजूनही खुल्ला ठेवला आहे.

Loading...

आता फडणवीस यांची अग्निपरीक्षा

देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर आता सर्वात मोठा यक्ष प्रश्न उभा ठाकला आहे तो म्हणजे बहुमत कसं सिद्ध करायचं? कारण, भाजपकडे 105 जागा आहे आणि सुधीर मुनगंटीवार यांनी दावा केल्याप्रमाणे 18 अपक्ष आमदारांचा पाठिंबा आहे. म्हणजे भाजपचा एकूण आकडा हा 123 झाला आहे. बहुमतासाठी 145 चा आकडा पार करावा लागणार आहे. म्हणजे, अजूनही भाजपला 22 आमदारांचा पाठिंबा घ्यावा लागणार आहे. सेना आपल्या अटीवर ठाम आहे, तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा पाठिंबा घेण्याची अशी शक्यता नाही. त्यामुळे सरकार कसं स्थापन करणार हीच मोठी फडणवीस यांची अग्निपरीक्षा ठरणार आहे.

पुढे काय?

जर फडणवीस यांनी बहुमत सिद्ध केलं नाहीतर त्यानंतर दुसऱ्या मोठा पक्षाला सरकार स्थापन करण्यासाठी आमंत्रण दिलं जाईल. विधानसभा निवडणुकीत दुसरा मोठा पक्ष हा शिवसेना आहे. परंतु, शिवसेनेनं अपक्षांना पाठिंबा घेऊन 64 जागांचा दावा केला आहे. त्यामुळे शिवसेनेला बोलवण्यात येऊ शकतं. विशेष म्हणजे, संजय राऊत यांनी आपल्याकडे 175 आमदारांचा पाठिंबा असल्याचं बोलून दाखवलं होतं. त्यामुळे सेना आता काय निर्णय घेतं हे पाहण्याचं ठरणार आहे.

काँग्रेस-राष्ट्रवादीची भूमिका गुलदस्त्यात

भाजप आणि सेनेत वाद पेटल्यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीने मोर्चेबांधणी सुरू केली आहे. काँग्रेसने तर आपले आमदार फुटू नये म्हणून जयपूरला हलवले आहे. शरद पवार यांनी आम्हाला विरोधी बाकावर बसण्याचा जनादेश दिला असं सांगत आहे. काँग्रेसनेही त्यांचा निर्णय हायकमांडवर सोपवला आहे. त्यामुळे भाजपने जर सरकार स्थापन करण्यात अपयशी ठरली तर काँग्रेस-राष्ट्रवादीची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.

पक्षीय बलाबल

भाजप - 105

शिवसेना - 56

राष्ट्रवादी - 54

काँग्रेस - 44

मनसे- 01

इतर - 28

===============================================

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 9, 2019 08:46 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...