Home /News /mumbai /

मोठी बातमी! एकनाथ शिंदे यांची केंद्रीय मंत्री अमित शाहंशी फोनवर चर्चा; शिंदेंनी केली 'ही' मागणी

मोठी बातमी! एकनाथ शिंदे यांची केंद्रीय मंत्री अमित शाहंशी फोनवर चर्चा; शिंदेंनी केली 'ही' मागणी

शिंदे (Shivsena leader Eknath Shinde) गटाच्या पत्रकार परिषदेनंतर आता एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या फोनवरुन चर्चा केल्याची माहिती समोर येत आहे.

    मुंबई, 25 जून : शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Shivsena leader Eknath Shinde) यांच्या कथित बंडानंतर आता शिवसेना आक्रमक झाली आहे. आज झालेल्या पक्षाच्या कार्यकारणी बैठकीत 3 मोठे ठराव मंजूर करण्यात आले आहेत. शिवाय बंडोखोरांवर कारवाई करण्याच्याही हालचाली सुरू झाल्या आहेत. राज्यात ठिकठिकाणी बंडखोर आमदारांच्या कार्यालय आणि घरांवर हल्ला करण्याचा प्रयत्न होत आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे गटही सावध झाला असून लवकर यातून मार्ग काढण्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी फोनवर चर्चा केल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. काय झाली चर्चा? शिवसेना नेते एकनाथ शिंदे आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची फोनवर चर्चा झाल्याची माहिती खात्रीशीर सुत्रांनी दिली आहे. बंडखोर आमदारांच्या कार्यालयांवर होणाऱ्या हल्लानंतर आता अशा आमदारांना केंद्रीय सुरक्षा देण्याविषयी चर्चा झाल्याचे समजते आहे. मात्र, बंडखोर आमदारांना केंद्रीय सुरक्षा मिळण्यास अडचणी येत आहेत. त्यामुळेच गुवाहाटीचा मुक्काम वाढल्याचे सांगण्यात येत आहे. सरकार स्थापन होईपर्यंत केंद्रीय सुरक्षा पुरवण्याची रणनीती आखली जात आहे. बंडखोर आमदारांची उद्धव ठाकरे सरकार पाडण्याची प्लॅनिंग सुरू आहे. त्यामुळे सरकारचा पाठिंबा काढून घेण्याविषयी कायदेविषयक बारकावे तपासण्यासाठी कायदेतज्ञ टीम काम करत आहे. दरम्यान, बंडखोर आमदारांची परत फिरण्याची मानसिकता दिसत नसल्याचेही सुत्रांनी सांगितले आहे. शिंदे गटाची पत्रकार परिषद "आम्हाला घाबरवण्याचा प्रयत्न केला जातोय. आम्ही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा विचार पुढे घेऊन जात आहोत. आम्ही शिवसेनेचेच सदस्य आहोत. आम्ही कुणाच्याही दबावाखाली बंड पुकारलेलं नाही. एकनाथ शिंदे हे आमच्या गटाचे नेते आहेत. आम्ही शिवसेनेच्या चिन्हावर निवडून आले आहोत. आमच्याकडे दोन तृतीयांश सदस्य आहेत", असं दीपक केसरकर म्हणाले. आदित्य ठाकरेंच्या टीकेनंतर एकनाथ शिंदे यांचं शिवसैनिकांना भावनिक आवाहन, म्हणाले.. "आम्ही महाराष्ट्रातून निघाल्यानंतर कमीवेळा बोलण्याची संधी मिळाली. आमचे नेते एकनाथ शिंदे यांनी मला प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देण्याची सूचना केली आहे. लोकांमध्ये गैरसमज निर्माण झालाय की आम्ही शिवसेनेतून बाहेर पडलो आहोत. पण आम्ही शिवसेना पक्षातच आहोत. आम्ही सर्वजण शिवसेनेचे सदस्य आहोत. पक्षाच्या आमदारांच्या मताप्रमाणे निर्णय होणे अपेक्षित असतं. त्यांचे काही अधिकार आणि निर्णय असतात. आपल्या राज्यामध्ये विविध कामे करावेत, अशी त्यांची अपेक्षा असते. तसेच सरकार चांगलं चालावं ही आपली जबाबदारी आहे म्हणून आम्ही आमच्या पक्षप्रमुखांना अनेकदा सूचवलं होतं. युतीमध्ये आपण लढलो, त्यांच्याचबरोबर राहू या, असा निर्णय सर्व आमदारानी घेतलेला होता", असं दीपक केसरकर यांनी सांगितलं. "कित्येक दिवस आम्ही सर्व उद्धव ठाकरे यांना सांगत होतो. ते पुढे सुद्धा आमचं ऐकतील, अशी आमची भावना आहे. एवढं सर्व सांगत आहेत तर त्याला काहीतरी कारण असेल. आम्हाला कुणीही सांगितलेलं नाही. आम्ही स्वत:हून निर्णय घेतलेला आहे. एकनाथ शिंदे आम्हाला नेते म्हणून उद्धव ठाकरे यांनीच दिले आहेत. शिंदेंच्या संपर्कात सर्व आमदार होते. सर्वांनी मिळून ठरवले. जे तृतीयांश बहमुताचा विषय हा संविधानिक आहे", असं केसरकर म्हणाले. "आमची संख्या 55 झाली आहे. 55 आमदारांचा नेता बदलवायचा असेल तर तो 16 लोकं एकत्र येऊन बदलवू शकत नाहीत. त्यामुळे जो काही निर्णय विधानसभेच्या उपाध्यक्षांनी दिलेला आहे त्या निर्णयाला आम्ही कोर्टात आव्हान देऊ. आमच्याकडे दोन तृतीयांश संख्या आहे. त्यामुळे कायद्यानुसार आम्हाला आमचा नेता निवडण्याचा अधिकार आहे", असं केसरकर म्हणाले.
    Published by:Rahul Punde
    First published:

    Tags: Amit Shah, Eknath Shinde

    पुढील बातम्या