मुंबई, 29 एप्रिल : महाराष्ट्रात (Maharashtra) आजपासून पुढचे काही दिवस फार महत्त्वाचे आहेत. कारण महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) घडामोडीच तशा घडणार आहेत. विशेष म्हणजे फक्त महाराष्ट्रच नाही तर या घडामोडी दिल्लीतही (Delhi) घडणार आहेत. त्यामुळे मुंबईपासून (Mumbai) ते दिल्लीपर्यंत सुरु असणारं राजकारण महाराष्ट्रासाठी फार महत्त्वाचं आहे. राज्यात मनसे पक्ष (MNS) भोंग्यांच्या मुद्द्यावरुन आक्रमक झाला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी याआधी घेतलेल्या दोन सभांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) आणि शिवसेनेवर (Shiv Sena) सडकून टीका केलीय. तर भाजकडून (BJP) मुंबईत पोलखोल यात्रेतून शिवसेनेला प्रचंड टार्गेट केलं जातं आहे. आता या आरोपांच्या आघातांना उत्तर देण्यासाठी शिवसेना देखील सज्ज झाली आहे. शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची 14 मे रोजी मुंबईच्या बिकेसीत (Mumbai BKC) जाहीर सभा होणार आहे. या सभेत उद्धव ठाकरे विरोधकांना सर्व प्रश्नांची उत्तरे देणार आहेत.
राज ठाकरे पुण्यात दाखल, कार्यकर्ते जोषात
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची औरंगाबादमध्ये सभा आयोजित करण्यात आली आहे. औरंगाबादमध्ये सांस्कृतिक मंडळाच्या मैदानात राज ठाकरे यांची 1 मे महााष्ट्रादिनी भव्य जाहीर सभा होणार आहे. या जाहीर सभेत राज ठाकरे भोंग्यांबाबतची आपली भूमिका मांडण्याची शक्यता आहे. त्यांनी याआधी मशिदींवरील भोंगे खाली उतरविण्यासाठी 3 मे पर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे. त्यांच्या या अल्टिमेटममुळे त्यांना औरंगाबाद पोलिसांनी सभेसाठी परवानगी देण्यास टाळाटाळ केली. अखेर मनसेचे ज्येष्ठ नेते बाळा नांदगावकर यांना औरंगाबादला रवाना व्हावं लागलं. तिथे पोलिसांसोबत बैठक झाल्यानंतर काही अटी-शर्तींच्या अधीन राहून राज ठाकरे यांच्या सभेला परवानगी मिळाली. या सभेआधी राज ठाकरे यांचा दोन दिवसांचा पुणे दौरा आहे. या दौऱ्यासाठी राज ठाकरे पुण्यात दाखल झाले आहेत. राज ठाकरे पुण्यात दाखल झाल्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. राज ठाकरे औरंगाबादच्या सभेसाठी उद्या पुण्याहून रवाना होणार आहेत. या सभेच्या पार्श्वभूमीवर मनसेच्या गोटात उत्साहाचं वातावरण आहे.
(अखेर नारदाच्या गादीवर बुटासहित पाय ठेवणारा पोलीस निरीक्षक वारकरी संप्रदायासमोर नमला)
शिवसेनेची डिनर डिल्पोमसी
दुसरीकडे शिवसेनेच्या गोटातही हालचालींना वेग आला आहे. राज ठाकरे 1 मे रोजी घेणाऱ्या सभेत शिवसेनेवर टीका करण्याची शक्यता आहे. त्यांच्या टीकेला उद्धव ठाकरे मुंबईत 14 मे रोजी घेणाऱ्या सभेत प्रत्युत्तर देणार आहेत. तसेच भाजपच्या पोलखोल यात्रेलादेखील ते सडेतोड उत्तर देणार आहेत. या कार्यक्रमाचं नियोजन आणि विविध मुद्द्यावंर चर्चा करण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी 'वर्षा' या शासकीय निवासस्थानी शिवसेनेच्या सर्व खासदारांसाठी स्नेहभोजनाचा कार्यक्रम बोलावला आहे. शिवसेनेच्या या डिनर डिप्लोमसीकडे राज्याचं लक्ष लागलं आहे. या कार्यक्रमात नेमकं कोणकोणत्या मुद्द्यांवर चर्चा होते याबाबतची माहित लवकरच समोर येईल.
पंतप्रधान मोदींकडून मुख्यमंत्र्यांसाठी डिनर डिप्लोमसी
महाराष्ट्रात एवढ्या सगळ्या घडामोडी घडत असताना दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील मुख्यमंत्र्यांसाठी 30 एप्रिल रोजी स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. पंतप्रधान मोदींची नुकतीच दोन दिवसांपूर्वी देशातील सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा झाली होती. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी मुख्यमंत्र्यांनी पेट्रोल-डिझेलच्या भाववाढीवरुन काही राज्यांना सुनावलं होतं. त्यानंतर आता पंतप्रधान मोदींनी मुख्यमंत्र्यांसाठी स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजिक केला आहे. पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या कार्यक्रमाला जाण्यास नकार दिला आहे. त्यांच्याऐवजी परिवहन मंत्री अनिल परब या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. तसेच बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनीही या डिनर डिप्लोमसीला हजर राहण्यास नकार दिला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.