SPECIAL REPORT : शरद पवार नावाचे चाणक्य!

SPECIAL REPORT : शरद पवार नावाचे चाणक्य!

निवडणूक विधानसभेची असो किंवा लोकसभेची, महाराष्ट्रात प्रत्येक निवडणूक पवार यांच्या नावाभोवतीच फिरते किंवा निवडणूक निकालानंतरचे राजकारण, सत्ताकारण पवारांभोवती फिरते.

  • Share this:

मुंबई, 26 नोव्हेंबर : महाराष्ट्राच्या राजकारण आणि समाजकारणाला ज्याने आपल्या कर्तृत्वाने आकार दिला. अफाट यश आणि बेफाट टीका या दोन्हींचा अगदी एकाच वेळी स्वीकार केला. ज्यांच्या प्रत्येक कृतीने विरोधकांसोबत साथीदारांनाही नेहमीच बुचकळ्यात टाकले. सलग ५२ वर्षे विधिमंडळ किंवा संसदेत प्रभाव टाकणारे ,महाराष्ट्र आणि राष्ट्र उभारणीच्या कामात जवळपास साठ वर्षं सक्रिय योगदान देणारे नाव म्हणजे शरद पवार.

शरद पवार यांचे राजकारण संपणार असे टप्पे महाराष्ट्राच्या राजकारणात अनेकदा आले होते. पण पवार प्रत्येक संकटावर स्वार होऊन यशस्वी होत गेले. आजही राजकारणातील प्रत्येक घडामोड आपल्या भोवती फिरवत ठेवण्यात हा तडफदार नेता यशस्वी ठरला. ज्या वयात लोकं राजकारणात सक्रिय नसतात त्या वयात, ऐंशीच्या उंबरठ्यावर पवार, निवडणुकीचा दणक्यात प्रचार करतात.  पावसात भिजत भाषणे करतात, शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन उभे राहतात, त्यांची दुःखे समजून घेतात, तरुणांशी त्यांना समजणाऱ्या भाषेत बोलतात म्हणून ते आजपण महत्वाचे ठरत आहेत. महाराष्ट्रात अवकाळी पावसाने प्रचंड नुकसान केल्यानंतर  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिल्लीत जाऊन भेटणारे पवारच आहेत.

निवडणूक विधानसभेची असो किंवा लोकसभेची, महाराष्ट्रात प्रत्येक निवडणूक  पवार यांच्या नावाभोवतीच फिरते किंवा निवडणूक निकालानंतरचे राजकारण, सत्ताकारण  पवारांभोवती फिरते. हा गेल्या अनेक वर्षांचा अनुभव आहे. २०१४ च्या निवडणुकीत सगळ्यांना अचंबित करत पवार यांनी भारतीय जनता पक्षाला बिनशर्त पाठिंबा देऊन शिवसेनेला सत्तेबाहेर फेकली होती. आज पाच वर्ष उलटल्यावर पवार म्हणतात ती एक राजकीय खेळी होती.

शरद पवार यांच्या प्रत्येक विधानाचा, बोलण्याचा, हसण्याचा, बघण्याचा किंवा न बघण्याचा लोक निरनिराळा अर्थ काढतात. आपले बोलणे आणि वागणे याचा कुणालाच थांगपत्ता लागू नये यासाठी धडपडणाऱ्या पवारांना कधी कधी आपली बाजू सावरताना अशा कठीण प्रसंगातही सामोरे जावे लागते. तुम्ही खोटे बोलत आहात, असे जेव्हा एखादा पत्रकार सहजपणे बोलून जातो, त्यावेळी पवारही बचावात्मक पवित्र्यात जातात.

महाराष्ट्राच्या आजवरच्या घडामोडींवर नेहमीच पवार प्रभाव राहिला. पण २०१९च्या निवडणुकीत त्यांनी बजावलेली भूमिका त्यांच्या अवघ्या कारकिर्दीवरील कळस म्हणता येईल. बरोबरीच्या साथीदारांनी, जवळच्या नातलगांनी पक्ष आणि सोबतीचा त्याग केला. भारतीय जनता पक्षाची यशाची कामं सतत वाढत असलेली. देवेंद्र फडणवीस यांचा कामांचा झंजावात , आघाडीतील  काँग्रेस पक्षातील महत्वाच्या नेत्यांचे पक्षांतर आणि काहींचे सूचक मौन, लोकांमध्ये राजकारणाबद्दल निर्माण झालेले नैराश्य या सगळ्या पार्श्वभूमीवर भाजप - सेना यशाचे आकडे मांडत असताना   " निराशा शूराच्या हृद्या कधीही स्पर्श नकरी" या काव्य पंक्तीना अनुसरून पवार निवडणूक प्रचार  कामाला लागले आणि त्यांनी भल्या भल्याना कामाला लावले.

२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपाला पाठिंबा देऊन पवारांनी ७० दिवसांसाठी का असेना  सेनेला भाजप पासून दूर केले होते. अगदी त्याचीच पुनरावृत्ती म्हणून २०१९ च्या  सत्ता संघर्षाकडे पाहता येईल. सध्या केंद्रात जरी सरकार भाजपचे असले, हाताशी फक्त ५४ आमदार असले , तरी  पवारांच्या घरीच  सत्तेचे समीकरण ठरताना दिसतंय. पवार पॉवर ती हीच म्हणता येईल.

काळ अनुकूल असो किंवा प्रतिकूल, पवार राजकारणात कायम सक्रिय असतात, गेल्या ५ वर्षात महाराष्ट्रातील अनेक आंदोलनांमागे खुली किंवा छुपी  पवार प्रेरणा  होती. नेत्याने आपल्या अवती भोवतीचे  वातावरण सतत तापत ठेवले पाहिजे आणि कायम नेतृत्व करण्यासाठी सिद्ध राहिले पाहिजे. हे पवारांच्या राजकारणाकडे पाहिल्यावर लक्षात येते.

=================

First published: November 26, 2019, 10:34 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading