मुंबई, 22 जून : शिवसेनेत सुरू असलेल्या अंतर्गत संघर्षामुळे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) सरकार अस्थिर झालं आहे. त्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांमध्ये हलचालींना वेग आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही (NCP) हालचालींना वेग आलाय. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या नेतृत्त्वाखाली राष्ट्रवादीच्या आमदारांची महत्त्वाची बैठक उद्या (गुरूवार) होणार आहे. राष्ट्रवादीचे 24 आमदार मुंबईच्या हॉटेल ट्रायडेंट मध्ये थांबले आहेत. उर्वरित आमदार सकाळी मुंबईत पोहचणार आहेत. या बैठकीत सध्याच्या पेचप्रसंगावर पक्षाच्या आमदाराची मतं जाणून घेतली जातील. त्यामुळे ठाकरे सरकारसाठी ही बैठक महत्त्वाची आहे.
पवारांनी दिला मोलाचा सल्ला
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी (
Sharad Pawar) उद्धव ठाकरेंना मोलाचा सल्ला दिल्याचं सांगितलं जात आहे. सत्ता वाचवण्यासाठी एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करा, असा सल्ला शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना दिल्याचं सांगितलं जात आहे. आपल्या फेसबुक लाइव्हमध्येही उद्धव ठाकरेंनी मी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देतो असं भावनिक आवाहन केलं होतं. दरम्यान शरद पवारांनाही एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करा असं सांगितलं आहे. अडीच वर्षांपूर्वी शरद पवारांच्या आग्रहावरुन उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले होते. त्यानंतर आज पवारांनी त्यांना मुख्यमंत्रिपद सोडण्याचा सल्ला दिला आहे.
मुख्यमंत्र्यांच्या भावनिक आवाहनाला शिंदेनी दिलं इमोशनल उत्तर! म्हणाले, बाळासाहेब....
उद्धव ठाकरेंचं भावनिक आवाहन
मुख्यमंत्र्यांनी बुधवारी संध्याकाळी ऑनलाईन संवाद साधत शिवसेनेतील बंडखोरांना भावनिक आवाहन केलं.'आज मी माझ्या राजीनाम्याचं पत्र तयार करून ठेवतो. संध्याकाळी बंडखोरी केलेल्या आमदारांनी यावं. मला खुर्चीचा कोणताही मोह नाही. मी ओढून ताणून खुर्चीवर बसणार नाही. मुख्यमंत्रिपद हे माझ्याकडे अनपेक्षितपणानं आलं. तुम्ही आम्हाला मुख्यमंत्री नको हे माझ्यासमोर येऊन सांगा. मी पद सोडून देईन. हे माझं नाटक नाही. संख्याबळही माझ्यासाठी गौण आहे.' असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी जाहीर केलं. यावेळी आपण मुख्यमंत्र्यांचं अधिकृत निवास्थान असलेलं वर्षा सोडणार असल्याची घोषणाही मुख्यमंत्र्यांनी केली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.