मुंबई, 16 मे : कोरोना व्हायरसने महाराष्ट्रात थैमान घातले आहे. दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. कोरोनावर मात करण्यासाठी डॉक्टर, आरोग्य कर्मचारी आणि पोलीस आपल्या जीवाची बाजी लावून कर्तृव्य बजावत आहे. परंतु, कोरोनामुळे पोलिसांचाही बळी गेला. मुंबईत आणखी एका पोलीस निरीक्षकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
शाहूनगर पोलीस ठाणे येथे कार्यरत असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल हनुमंत कुलकर्णी (वय 32) हे ताप व सर्दी यामुळे आजारी होते. त्यामुळे कुलकर्णी यांनी रुग्णनिवेदन केले होते आणि घरीच राहण्यासाठी अर्ज केला होता.
हेही वाचा -चौथ्या मजल्यावर गॅलरीत बसून मुलांना जेवून घालत होती आई, स्टूलवरून तोल गेला आणि..
कोरोनाची चिंताजनक परिस्थितीत असल्यामुळे अमोल कुलकर्णी यांनी सायन रुग्णालयात जाऊन 13 मे रोजी कोरोनाची चाचणी केली होती. आज 3 दिवसानंतर त्यांच्या रिपोर्ट प्राप्त झाला. त्यात हनुमंत कुलकर्णी यांना कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं.
परंतु, आज पहाटे 5 वाजेच्या सुमारास कुलकर्णी हे आपल्या राहत्या घरातील बाथरूममध्ये बेशुद्ध अवस्थेत आढळून आले होते. त्यांना तातडीने सायन रुग्णालय इथं उपचारासाठी नेण्यात आले परंतु, रुग्णालयात दाखल करण्याआधीच त्यांचा मृत्यू झाला होता. डॉक्टरांनी कुलकर्णी यांना तपासून मयत घोषित केलं, अशी माहिती
शाहूनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास गंगावणे यांनी दिली. तसंच, अमोल कुलकर्णी यांच्या मृत्यूबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केलं.
राज्यात आतापर्यंत 1 हजार 140 पोलीस कोरोनाबाधित
दरम्यान, काल 15 मे रोजी मुंबई पोलीस दलातील आणखी एका कर्मचाऱ्याचा (mumbai police) कोरोनामुळे बळी गेला. शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक भगवान पार्टे यांची कोरोनाविरुद्धची झुंज अपयशी ठरली. 45 व्या वर्षी एमजीएम रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. 15 मेपर्यंत राज्यात कोरोनामुले 10 पोलिसांचा मृत्यू झाला आहे. तर राज्यात गेल्या 24 तासात 79 पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे.
हेही वाचा - लॉकडाउन 4.0 मध्ये होणार बदल, 'या' मुद्यांवर राज्य सरकार घेणार निर्णय
दिवसेंदिवस वाढणाऱ्या या संख्येमुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे. त्यामुळे 55 वर्षांपेक्षा अधिक वय असणाऱ्या पोलिसांना घरी राहण्याच्या सूचना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देण्यात आला आहेत. मुंबई पोलीस दलात आतापर्यंत जवळपास 600 च्या आसपास पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. तर राज्यात आतापर्यंत 1 हजार 140 पोलिसांना कोरोनाची लागण झाली असून त्यामध्ये 112 पोलीस अधिकाऱ्यांचाही समावेश आहे. तर या आजारात 9 पोलिसांनी आपला जीवही गमावला आहे.
संपादन - सचिन साळवे
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.