मुंबई, 24 मे: राज्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत आहे. याच पार्श्वभूमीवर राज्य सरकार लॉकडाऊन शिथिल करण्याचा विचार करत आहे. चार टप्प्यात राज्यात अनलॉक होईल असं सांगण्यात येत आहे. मुंबईतही कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली. राज्य सरकारनं लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर सर्व सामान्यांसाठी लोकल सेवा बंद करण्यात आली. त्यानंतर आता केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी लोकल सेवा सुरु आहे. दरम्यान आता 1 जूननंतर सर्व सामान्य रेल्वे प्रवाशांसाठी लोकल सेवा सुरु होईल का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. या पार्श्वभूमीवर मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी भाष्य केलं आहे. लोकल पुढील 15 दिवस तरी सर्व प्रवाशांसाठी खुली करता येणार नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
जूनपर्यंत लोकल सेवा बंदच?
सर्वसामान्य प्रवाशांसााठी लोकल बंद आहे त्यामुळे मुंबईत कोरोनाच्या रुग्णांचा आकडा कमी झाला आहे. त्यामुळे पुढचे काही दिवस तरी मुंबई लोकलवर निर्बंध लावावाच लागेल आणि 15 दिवस तरी लोकलची गर्दी कमी करावीच लागेल,असं वडेट्टीवार यांनी सांगितलं आहे.
कोरोनाची दुसरी लाट आता ओसरत आहे. हे पाहता राज्य सरकारनं 30 जूनपर्यंत चार टप्प्यात अनलॉक प्रक्रिया राबवण्याचा विचार केला आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या शक्यतेमुळे काही निर्बंध कायम असतील.
हेही वाचा- 'या' क्षुल्लक कारणामुळे दादरमध्ये टॅक्सी चालकाची निर्घृण हत्या
राज्यातील रेड असलेल्या जिल्ह्यात असतील कडक निर्बंध
राज्य सरकार 1 जूनपासून काही गोष्टींवरील निर्बंध मागे घेण्याच्या तयारीत असल्याचं संकेत विजय वडेट्टीवार यांनी दिलेत. रेड झोनमधील जिल्हे वगळता राज्यातील लॉकडाऊन 1 जूननंतर शिथिल होण्याची शक्यता असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. त्यामुळे राज्यात सध्या 14 जिल्हे रेड झोनमध्ये असून रुग्णांचा आकडा बघून लॉकडाऊनसंदर्भात निर्णय घेतला जाणार असल्याचं ते म्हणालेत.
हेही वाचा- काय सांगता! मास्क न घालणाऱ्या मुंबईकरांमुळे पालिकेच्या खजिन्यात कोट्यवधी
येत्या 5 ते 6 दिवसात राज्यात काय परिस्थिती असेल याचा आढावा घेऊनच निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती वडेट्टीवार यांनी दिली. तसंच रेड झोन असलेल्या जिल्ह्यातल्या कोरोना स्थितीचा आठवड्याभरात आढावा घेण्यात येईल. त्यानंतर जिल्हानिहाय त्यासंदर्भातले निर्णय घेण्यात येतील. रेड झोनमधल्या जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णांचा आकडा कमी झाला नाही तर कडक लॉकडाऊन काय राहणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Coronavirus, Lockdown, Mumbai, Mumbai local, Train