Home /News /mumbai /

'नियम पाळा; विनाकारण बाहेर फिरल्यास पोलीस कारवाई करणार', गृहमंत्र्यांचा आक्रमक इशारा

'नियम पाळा; विनाकारण बाहेर फिरल्यास पोलीस कारवाई करणार', गृहमंत्र्यांचा आक्रमक इशारा

राज्यातील कोरोनाची स्थिती (Maharashtra Corona Situation) अतिशय बिकट असून संसर्गाची ही साखळी तोडण्यासाठी आज रात्री आठ वाजल्यापासून राज्यात संचारबंदी लागू होत आहे. .

    मुंबई, 14 एप्रिल : राज्यातील कोरोनाची स्थिती (Maharashtra Corona Situation) अतिशय बिकट असून संसर्गाची ही साखळी तोडण्यासाठी आज रात्री आठ वाजल्यापासून राज्यात संचारबंदी लागू होत आहे. या पार्श्वभूमीवर गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील (Home Minister Dilip Walse-Patil) यांनी नागरिकांना विनाकारण घराबाहेर फिरू नका. अन्यथा, पोलीस कारवाई करतील, असा इशारा दिला आहे. राज्यात आज रात्रीपासून 1 मेपर्यंत संचारबंदी (Maharashtra Lockdown) लागू होणार आहे. लोकांनी नियम पाळून प्रशासनाला सहकार्य करावे. जिल्हा अंतर्गत आणि इतर राज्यातूनही वाहतूक प्रवास करता येईल. मात्र, विनाकारण बाहेर पडल्यास पोलीस कारवाई करतील. वेगवेगळ्या ठिकाणी नाकाबंदीची व्यवस्था करण्यात आली आहे. मागच्या वेळेची टाळेबंदी आणि आत्ताचे संचारबंदी यामध्ये फरक आहे. मात्र लोकांनी स्वतःहून काळजी घेणे गरजेचे आहे. फडणवीसांच्या टीकेला अर्थ नाही... कडक निर्बंध लावत सरकारने जाहीर केलेले पॅकेज म्हणजे केवळ धूळफेक असल्याची टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली होती, त्यावर बोलताना गृहमंत्री म्हणाले की, फडणवीस यांच्या टीकेला काही अर्थ नाही. सरकारने गोरगरिबांसाठी जे पॅकेज जाहीर केले आहे, त्याचा लोकांना संचारबंदीच्या काळात फायदाच होणार आहे. दुसरीकडे, माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विषयी विचारले असता दिलीप वळसे पाटील यांनी त्याबाबत अधिक बोलण्यास नकार दिला. अनिल देशमुख यांची चौकशी सुरू आहे. ते चौकशीला सामोरे जात आहेत. त्यामुळे चौकशी सुरू असताना त्यावर आता बोलणे योग्य होणार नाही, असं ते म्हणाले. दरम्यान, भयानक पद्धतीनं वाढणारी कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी अखेर महाराष्ट्र सरकारने 15 दिवसांसाठी संचारबंदी लागू केली आहे. आज (बुधवार) संध्याकाळी 8 वाजल्यापासून हे निर्बंध लागू होतील. 'ब्रेक द चेन' मोहिमेंतर्गत कोरोना साखळी तोडण्याचे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  (CM Uddhav Thackeray ) यांनी केले आहे. 1 मे रोजी सकाळी 7 वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात येत असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी केली. या काळात अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहेत.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Corona hotspot, Corona spread, Corona updates

    पुढील बातम्या