मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

Rajesh Tope : 'खासगी रुग्णालयाचं 34 लाखांचं ते बिल आईचं, माझं वैयक्तिक कुठलंही मेडिकल बिल नाही', आरोग्यमंत्र्यांचा खुलासा

Rajesh Tope : 'खासगी रुग्णालयाचं 34 लाखांचं ते बिल आईचं, माझं वैयक्तिक कुठलंही मेडिकल बिल नाही', आरोग्यमंत्र्यांचा खुलासा

"माझं वैयक्तिक कुठलंही मेडिकल बिल नाही. माझी आई आजारी होती. तिचं ते बिल आहे", असा खुलासा राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी केला.

  • Published by:  Chetan Patil
औरंगाबाद, 21 एप्रिल : महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) खळबळ उडवून देणारी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. कोराना काळात राज्याच्या 18 मंत्र्यांनी कोरोनाची लागण झाल्यानंतर खासगी रुग्णालयांमध्ये उपचार घेतले आणि त्याचे बिल सरकारी तिजोरीच्या माथी पडले. माहिती अधिकारातून संबंधित माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांच्या नावे सर्वाधिक 34 लाख 40 हजार रुपये बिल खासगी रुग्णालयाचे आहे. ते बिल सरकारी तिजोरीतून भरले गेल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत माहिती उघड झाल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. या बातमीवर आता राजेश टोप यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. आपलं कोणतंही वैयक्तिक मेडिकल बिल नसून आपल्या आईचं बिल आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. राजेश टोपे नेमकं काय म्हणाले? "माझं वैयक्तिक कुठलंही मेडिकल बिल नाही. माझी आई आजारी होती. तिचं ते बिल आहे", असा खुलासा राजेश टोपे यांनी केला. "राहिला इतरांचा प्रश्न तर हा ज्याचा-त्याचा प्रश्न आणि त्यांचा अधिकार आहे. ही सुविधा आहे आणि त्यांनी ती सुविधा घेतली. आमचे मेडिकल इन्शुरन्स सुद्धा आहे. त्यातून हे पैसे जात असतील. यातून सरकारी दवाखान्यांवर विश्वास नाही, असा काही प्रश्न नाही", असं स्पष्टीकरण राजेश टोपे यांनी दिलं. 18 मंत्र्यांमध्ये कोणाकोणाचा समावेश? 'झी 24 तास'ने दिलेल्या माहितीनुसार, आरोग्यमंत्री राजेश टोपे (बिल 34 लाख 40930), ऊर्जामंत्री नितीन राऊत (बिल 17 लाख 63,879), ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (बिल 14 लाख 56,604), महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार ( बिल 12 लाख 56,748), गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड (बिल 11 लाख 76,278), अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (बिल 9 लाख 3,401), पशुसंवर्धनमंत्री सुनील केदार (बिल 8 लाख 71,890), जलसंपदामंत्री जयंत पाटील (बिल 7 लाख 30,513), उद्योगमंत्री सुभाष देसाई ( बिल 6 लाख 97,293), परिवहन मंत्री अनिल परब (बिल 6 लाख 79,606) यांचा समावेश आहे. तसेच दोन लाखांपर्यंत उपचार घेतलेल्या मंत्र्यांमध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांचा समावेश आहे. तर एक लाखापर्यंत उपचार घेतलेल्या मंत्र्यांमध्ये आदिवासी विकास मंत्री के. सी. पाडवी यांचा समावेश आहे. तर 50 हजारच्या जवळपास राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे, ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी उपचार घेतले आहेत. (कोरोना काळात 18 मंत्र्यांचे खासगी रुग्णालयात उपचार, तब्बल 1 कोटी 40 लाखांचे बिल सरकारच्या माथी) छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया दरम्यान, राज्यातील 18 मंत्र्यांनी तब्बल 1 कोटी 40 लाखांचे उपचार खासगी रुग्णालयात घेतल्याची माहिती समोर आल्यानंतर मंत्री छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. "कारोना काळात मी हॉस्पिटलमध्ये दाखल झालो नव्हतो. मी घरात होतो. गेल्यावर्षी रुग्णालयात दाखल झालो तेव्हा मला हृदय विकाराशी संबंधित त्रास होता. त्यामुळे दाखल झालो होतो. पण मी कोरोनामुळे दाखल झालो नव्हतो", अशी प्रतिक्रिया छगन भुजबळ यांनी दिली.
First published:

Tags: Corona, Rajesh tope, महाराष्ट्र

पुढील बातम्या