कर्तव्य बजावताना ‘कोरोना’मुळे मृत्यू झाल्यास सरकार देणार पोलिसांच्या कुटुंबाला 50 लाखांची मदत
कर्तव्य बजावताना ‘कोरोना’मुळे मृत्यू झाल्यास सरकार देणार पोलिसांच्या कुटुंबाला 50 लाखांची मदत
Mumbai: Volunteers of Siddhivinayak Temple Trust distribute food and bottled water to police and traffic police personnel deployed on duty during day-2 of a nationwide lockdown, imposed in the wake of coronavirus pandemic, at Mahim in Mumbai, Thursday, March 26, 2020. (PTI Photo/Kunal Patil)(PTI26-03-2020_000082B)
कोरोनाविरुद्धच्या लढाईत डॉक्टर्स आणि पोलिसांना आघाडीवर राहून लढावं लागत आहे.
मुंबई 03 एप्रिल :राज्यातील पोलिस दल ‘कोरोना’विरुद्धच्या लढाईत जोखीम पत्करुन योगदान देत आहे. कर्तव्य बजावताना पोलिस दलातील अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांचा ‘कोरोना’मुळे मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबियांना 50 लाख रुपये सानुग्रह अनुदान देण्यात येणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज ही माहिती दिली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. त्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
या बैठकीला गृहमंत्री अनिल देशमुख, आरोग्यमंत्री राजेश टोपे, वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मनोज सौनिक यांच्यासह अर्थ, आरोग्य, उद्योग विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. ‘कोरोना’विरुद्धच्या लढ्यात आघाडीवर राहून लढणाऱ्या सार्वजनिक आरोग्य, वैद्यकीय शिक्षण, पोलिस आदी विभागांना मार्च महिन्याचे उर्वरीत वेतन प्राधान्याने देण्यात यावे, असा निर्णयही बैठकीत घेण्यात आला. ‘कोरोना’विरुद्धच्या लढ्यात होमगार्ड जवानांची अतिरिक्त मदत घेण्याचे अधिकार विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहेत.
देशभरात दिवसेंदिवस कोरोनाग्रस्तांची संख्या वेगानं वाढत आहे. एका दिवसात 235 नवीन लोकांना कोरोनाची लागण झाली असून आतापर्यंत देशभरातील आकडा 2 हजारच्या वर गेला आहे. त्यातही सर्वात जास्त रुग्णांची संख्या महाराष्ट्र, केरळ, तेलंगणा राज्यात आहे. महाराष्ट्रात 400हून अधिक कोरोनाच्या पॉझिटिव्ह केसेस आढळल्या आहेत.
पोलिसांची मोठी कारवाई, एकत्र नमाज पठणासाठी गेलेले 70हून अधिकजण ताब्यात
धक्कादायक बाब म्हणजे आता कोरोना अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्यांच्या घरात किंवा कार्यालयात पोहोचू लागला आहे. 14 एप्रिलपर्यंत लॉकडाऊनच्या सूचना असतानाही नागरिकांची अडचण होऊ नये म्हणून अत्यावश्यक सेवा सुरू ठेवण्यात आल्या. त्यातलीच एक अत्यावश्यक सेवा म्हणजे बेस्ट. याच बेस्टमधील कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे.
कोरोनाची लागण झालेला पहिला कर्मचारी असल्याची माहिती मिळत आहे. बेस्टमध्ये कोरोना शिरल्यानं आता चिंता व्यक्त केली जात असून सफाई कामगारांनंतर आता बेस्टमधील कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण होण्यास सुरुवात झाली आहे. वडाळा डेपोमध्ये फोरमन म्हणून हा कर्मचारी काम करत होता.
या कर्मचाऱ्याला एस. आर. व्ही. रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. त्याच्या संपर्कात आलेल्या इतर कर्मचाऱ्यांनाही 14 दिवस होम क्वारंटाइनमध्ये ठेवलं जाणार आहे. टिळकनगर इमारतीमधील लोकांनी कोरोनाच्या भीतीनं आता स्वत:ला होम क्वारंटाइन करून घेतल्याची माहिती मिळत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.