महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या लसीकरणाबाबत शिक्षण मंत्र्यांनी दिली महत्त्वपूर्ण माहिती

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या लसीकरणाबाबत शिक्षण मंत्र्यांनी दिली महत्त्वपूर्ण माहिती

आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि उच्च तंत्र शिक्षण सचिव यांच्याबरोबर शनिवारी सकाळी बैठकीत चर्चा होणार आहे. यानंतर याबाबत निर्णय होणार असल्याचंही सामंत म्हणाले.

  • Share this:

मुंबई, 23 एप्रिल : राज्यात 1 मेपासून 18 वर्षापुढील सर्वांसाठी लसीकरण सुरू होत आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार लसीकरणासाठी विविध प्रकारचं नियोजन करत आहे. त्याच एक भाग म्हणजे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी आरोग्य विभागामार्फत आराखडा आखून लसीकरण करण्याचा सरकारचा विचार आहे. याबाबत राजेश टोपे यांच्याबरोबर बैठकीनंतर निर्णय होणार असल्याचं उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी म्हटलं आहे.

(वाचा-समाजसेवेचा वसा : बेवारस कोरोनाग्रस्त मृतांना 'मुक्ती' देणारा खाकीतला ज्ञान'देव')

राज्यात लसीकरणाच्या या टप्प्यामध्ये मोठ्या प्रमाणावर लसीकरण केंद्रांवर गर्दी होण्याची शक्यता आहे. या टप्प्यात असलेल्या वयोगटातील नागरिकांची संख्या सर्वाधिक आहे. त्यामुळं राज्यातील जवळपास 37 लाख विद्यार्थ्यांच्या लसीकरणासाठी आरोग्य विभागाच्या आराखड्यानुसार नियोजन करण्याचा सरकारचा विचार आहे. तसं झाल्यास लसीकरण केंद्रांवरचा ताण मोठ्या प्रमाणावर कमी होऊ शकतो. याबाबत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी कुलगुरुंशी चर्चा केली आहे. याबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि उच्च तंत्र शिक्षण सचिव यांच्याबरोबर शनिवारी सकाळी बैठकीत चर्चा होणार आहे. यानंतर याबाबत निर्णय होणार असल्याचंही सामंत म्हणाले. विद्यार्थ्यांना मोफत लसीकरण करण्याबाबतची यावेळी चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

(वाचा-कोरोना उपचाराचा जुलिया पॅटर्न : इथं अगदी साध्या गोळ्यांनी तंदुरुस्त होतात रुग्ण)

राज्य सरकार आणि उच्च आणि तंत्रशिक्षण विभागानं राज्यातील कृषी विद्यापीठं वगळता इतर 13 विद्यापीठांच्या परीक्षा आणि निकाल याबाबतही महत्त्वाचा निर्णय घेतले आहेत. या निर्णयांसंदर्भात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना माहिती दिली जाणार आहे. त्यानंतर हे निर्णय जाहीर केले जाण्याचीदेखील शक्यता आहे.

राज्यातील कोरोनाच्या स्थितीवरही उदय सामंत यांनी भाष्य केलं आहे. रमेडीसीवीर औषधासंदर्भात कोणतंही राजकारण होता कामा नये, यासाठी मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांना पत्र लिहिल्याचं त्यांनी सांगितलं. सर्व राज्यांना न्याय मिळाला पाहिजे, अशी विनंती पंतप्रधानांना केली आहे. एकूणच लसीकरणाच्या तयारीसाठी राज्य सरकार नियोजन करत असून लवकरच विद्यार्थ्यांच्या लसीकरणाबाबत निर्णय होणार आहेत.

Published by: News18 Desk
First published: April 23, 2021, 8:52 PM IST

ताज्या बातम्या