शिल्लक फक्त 48 तास; सत्ता स्थापनेच्या या आहेत 9 शक्यता!

शिल्लक फक्त 48 तास; सत्ता स्थापनेच्या या आहेत 9 शक्यता!

राज्यातील सरकार स्थापनेसंदर्भातील सर्व निर्णय आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे आहेत.

  • Share this:

मुंबई, 07 नोव्हेंबर: महाराष्ट्रात 2014मध्ये निर्माण झालेल्या विधानसभेचा अखेरचा दिवस शनिवारी म्हणजेच 9 नोव्हेंबर रोजी आहे. 2019च्या विधानसभेचा निकाल जाहीर होऊन दोन आठवडे झाले तरी अद्याप सरकार स्थापने संदर्भातील चित्र स्पष्ट झालेले नाही. शिवसेनेने थेट मुख्यमंत्रिदपदावर दावा केला आहे आणि याच कोणत्याही प्रकारची तडजोड करणार नसल्याचे म्हटले आहे. शिवसेना भलेही भाजपला धमकी देत असले तरी त्यांनी अद्याप दुसऱ्या पर्यायांकडे पाऊल टाकलेले नाही. दुसऱ्या बाजूला भाजप अद्याप सरकार स्थापनेसंदर्भात सक्रीय झालेले नाही.

राज्यातील सरकार स्थापनेसंदर्भातील सर्व निर्णय आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे आहेत. उद्धव ठाकरे भाजपसोबत जाणार की राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसला जवळ करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आतापर्यंत शिवसेना आणि भाजप यांच्यात कोणत्याही प्रकारची चर्चा झाली नाही. सरकार स्थापन करण्याच्या दृष्टीने आज भाजपचे नेते राज्यपालांची भेट घेणार आहेत. तर शिवसेनेच्या सर्व आमदारांची आज तातडीची बैठक होत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात सत्ता स्थापनेचे 9 पर्याय दिसत आहेत.

1) विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक जागा मिळाल्या म्हणून भाजप सरकार स्थापनेचा दावा करू शकेल. पण बहुमतासाठीचे संख्याबळ नसल्यामुळे ते अपक्ष आणि अन्य पक्षातील आमदारांचे समर्थन मिळवण्याचा प्रयत्न करतील. अशा प्रकारे भाजपने याआधी अनेक राज्यात सरकार स्थापन केले आहे. विधानसभेतील बहुमतासाठी 145चे संख्याबळ मिळवण्यासाठी भाजपला अद्याप 40 आमदारांची गरज आहे. यासाठी ते विरोधी पक्षातील आमदारांना गळाला लावण्याचा प्रयत्न करतील. तसे झाले तर त्यांचे पहिले टार्गेट शिवसेनेचे आमदार असतील.

2) विजयी झालेल्यापैकी अपक्ष वगळता अन्य कोणत्याही पक्षाचे आमदार फुटण्याची शक्यता नाही. जर तसे झाले तर संबंधित आमदारांना त्यांच्या समर्थकांना उत्तर द्यावे लागेल. असा प्रकार हरियाणात झाला आहे. दुष्यंत चौटाला यांनी भाजपसोबत युती केली. आता येथील जाट समाज चौटाला यांना भाजप सोबत का गेला असा सवाल विचारत आहे.

3) जर कोणत्याच पक्षाने सरकार स्थापन केले नाही तर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होऊ शकते. याचा अर्थ राज्याची सत्ता दिल्लीच्या हाती असेल. अशा परिस्थितीत शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्र येण्याची शक्यता आहे. तर भाजप देखील अन्य पक्षातील आमदारांना जवळ करण्याचा प्रयत्न करेल.

4) शिवसेनेला भाजप सोबत चर्चा करायची असेल तर तशी चर्चा दिल्लीतूनच झाली पाहीजे. पण दिल्लीत देखील शिवसेना कोणाची बोलणार हा प्रश्न आहे. उद्धव ठाकरे यांना पंतप्रधान मोदी अथवा भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्याशी चर्चा करायची आहे. युतीच्या पहिल्या कार्यकाळात देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला सोबत ठेवण्यात यश मिळवले होते. पण आता उद्धव ठाकरे यांना त्यांच्याशी चर्चा करायची नाही. याशिवाय दोन्ही पक्षातील दरी दूर करणारे नितीन गडकरी देखील यावेळी बाजूलाच आहेत. सध्याच्या परिस्थितीत गडकरी यातून मार्ग काढू शकतील असा विश्वास अनेकांना वाटतो.

5) गडकरी यांना राजकारणाचा मोठा अनुभव आहे. शिवसेना देखील त्यांना गंभीरपणे घेते. भाजप अध्यक्ष, शिवसेना आणि उद्योग जगतात देखील गडकरींना पाठिंबा आहे. याशिवाय संघ देखील त्यांच्या पाठिशी उभा आहे. अशा परिस्थितीत गडकरी महत्त्वाची भूमिका बजावू शकतात.

6) जर भाजप पुन्हा सत्तेत आली तर त्यांना दुसऱ्या फळीतील नेत्यांना तयार करावे लागेल. यात एकनाथ खडसे, पंकजा मुंडे, विनोत तावडे, प्रकाश मेहता या नेत्यांचा समावेश असेल. या दुसऱ्या फळीतील नेत्यांना दूर करणे भाजपसाठी धोक्याचा इशारा ठरू शकतो.

7) राज्यातील या सर्व राजकीय परिस्थितीवर शरद पवार हे अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. पवारांना गेल्यावेळी पेक्षा अधिक जागा मिळवल्याचे महत्त्व चांगलेच माहित आहे. राष्ट्रवादी सध्या भलेही सत्तेच्या स्पर्धेत नसले तरी भाजप आणि शिवसेनेच्या बिघाडीनंतर त्यांची सर्वात महत्त्वाची भूमिका असणार आहे.

8) विधानसभा निवडणुकीत 44 जागा जिंकणाऱ्या काँग्रेसला 16 टक्के मते मिळाली आहेत. राज्यातील या राजकीय परिस्थितीत काँग्रेसला भविष्यासाठीचे धोरण ठरवता येणार आहे.

9) सर्वात शेवटी राज्यातील राजकीय कोंडीवर भाजप कोणता पर्याय निवडते यावर सर्व काही ठरणार आहे. 2014च्या विधानसभेत बहुमताच्या जवळ पोहोचलेल्या भाजपला यावेळी 105 जागा मिळाल्या आहेत. विशेष म्हणजे दोन वेळा लोकसभेत दणदणीत विजय मिळवणाऱ्या भाजपला विधानसभेत मात्र तसे यश मिळवता आले नाही. राज्यात देवेंद्र आणि केंद्रात नरेंद्र ही जोडी गेली पाच वर्षे काम करत आहे. इतकच नव्हे तर भाजपने देशातील सर्वात श्रीमंत मुंबई महापालिकेत देखील चांगले यश मिळवले होते. अशा परिस्थिती शिवेसेनेला साथ देत भाजप स्वत:ची स्थिती मजबूत करतात की आक्रमक राजकारण करून पुढे जाण्याचा विचार करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 7, 2019 11:30 AM IST

ताज्या बातम्या