Home /News /mumbai /

अर्णब गोस्वामींच्या अडचणीत होऊ शकते वाढ; ठाकरे सरकारची सुप्रीम कोर्टात धाव

अर्णब गोस्वामींच्या अडचणीत होऊ शकते वाढ; ठाकरे सरकारची सुप्रीम कोर्टात धाव

अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात अटकेत असलेल्या पत्रकार अर्णब गोस्वामी (Arnab Goswami) यांच्या अडचणी आणखी वाढू शकतात.

    मुंबई, 10 नोव्हेंबर: अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात अटकेत असलेल्या पत्रकार अर्णब गोस्वामी (Arnab Goswami) यांच्या अडचणी आणखी वाढू शकतात. राज्य सरकारकडून अर्णब गोस्वामी प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात 'कॅव्हेट' दाखल करण्यात आले आहे. राज्य सरकारची बाजू ऐकल्याशिवाय कोर्टानं निर्णय देऊ नये यासाठी खबरदारीचा हा कायदेशीर उपाय राज्य सरकारने अवलंबला आहे. याआधी अर्णब गोस्वामींचा जामीन अर्ज कोर्टाकडून फेटाळण्यात आला होता. तुरुंगात असलेल्या अर्णब गोस्वामी यांना त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेण्याची परवानगी द्या, अशी मागणी होत आहे. मात्र पोलिसांकडून ही परवानगी देण्यात आली नाही. अशातच आता राज्य सरकारने कॅव्हेट दाखल केल्याने अर्णब यांच्या अडचणी वाढल्या आहेत. त्याचप्रमाणे नाईक कुटुंबीयांनीही मध्यस्थ याचिका दाखल केली आहे. नाईक कुटुंबीय या प्रकरणात मुळ तक्रारदार असल्याने त्यांचीही बाजू कोर्टाने ऐकून घ्यावी अशी मागणी या याचिकेत करण्यात आली आहे. (हे वाचा-Bihar: ‘अमेरिकेत EVM मशीन्स असती तर ट्रम्प हरले असते का?’ काँग्रेसची शंका) अर्णब गोस्वामी यांना अटक करण्यात आल्यानंतर 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. गोस्वामी यांना अलिबागमधील कोरोना सेंटर असलेल्या एका शाळेमध्ये क्वारंटाइन ठेवण्यात आले होते. त्यानंतर 4 दिवसांनी त्यांची रवानगी तळोजा कारागृहात करण्यात आली आहे. कोरोना संक्रमण टाळण्यासाठी कोणत्याही कैद्यांना त्यांच्या कुटुंबीयांना भेटू दिले जात नाही आहे, परिणामी अर्णब यांच्या कुटुंबीयांना जेलमध्ये जाऊन भेटता येणार नाही अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली होती. अर्णब गोस्वामी यांच्या विरुद्ध अलिबाग नंतर मुंबई पोलिसांनीही  FIR दाखल केली होती.  पोलिसांचं पथक अर्णब गोस्वामी यांच्या घरी पोहोचल्यानंतर महिला पोलीस अधिकाऱ्याला धक्काबुक्की केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. मुंबई पोलिसांनी कलम 353 नुसार अर्णब गोस्वामीवर केला गुन्हा दाखल केला होता. सरकारी कामात अडथळा, सरकारी कर्मचा-यांशी हुज्जत घालणे  असे आरोप करत  गुन्हा दाखल केला होता. (हे वाचा-बिहार निवडणुकीचे दोन्ही चेहरे निष्प्रभ? सर्वाधिक स्ट्राइक रेट डावे आणि भाजपचा!) गोस्वामी यांच्या अटकेनंतर देशभरात विविध पडसाद उमटले आहेत. भाजपने विविध ठिकाणी त्यांच्या अटकेविरोधात निदर्शने देखील केली आहेत. नेमकं काय आहे प्रकरण? मुंबईत 'कॉन्कर्ड डिझाइन्स लिमिटेड' नावाची कंपनी असणारे इंटिरियर डिझायनर अन्वय नाईक यांनी अलिबागजवळील कावीर इथं आपल्या घरी आत्महत्या केली होती. 2018 मध्ये ही घटना घडली. त्यांच्या खिशात एक सुसाइड नोट आढळून आली होती, अर्णब गोस्वामी, आयकास्ट स्लॉशस्काय मीडियाचे फिरोज शेख, स्मार्ट वर्क्सचे नितेश सारडा यांच्यावर पैसे थकवल्याचा आरोप करत त्यामुळे आत्महत्या करत असल्याचे नमूद करण्यात आले होते.  या प्रकरणी गोस्वामी यांच्यासह तीन जणांवर अलिबाग पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Breaking News, Television

    पुढील बातम्या