'महाशिवआघाडी'ला विरोध.. काँग्रेस नेत्यांचा 'महाविकासआघाडी'वर जोर?

'महाशिवआघाडी'ला विरोध.. काँग्रेस नेत्यांचा 'महाविकासआघाडी'वर जोर?

महाराष्ट्रात शिवसेनेसोबत सत्ता स्थापन करण्यास काँग्रेस कार्यकारिणीचा हिरवा कंदील.. पण,

  • Share this:

मुंबई,21 नोव्हेंबर: महाराष्ट्रात शिवसेनेसोबत सत्ता स्थापन करण्यास काँग्रेस कार्यकारिणीने हिरवा कंदील दाखवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. राजधानी दिल्लीमध्ये गुरुवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीला सुरुवात झाली. या बैठकीत शिवसेनेसह सत्ता स्थापन करण्यावर शिक्कामोर्तब झाल्याचे समजते. मात्र, 'महाशिवआघाडी'ला काँग्रेस नेत्यांनी विरोध केला आहे. त्या ऐवजी 'महाविकासआघाडी' असावे अशी आग्रही भूमिका काँग्रेसने घेतली आहे. मात्र, शिवसेनेने अद्याप याबाबत कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

दरम्यान, राज्यात नव्या सरकारस्थापनेविषयीच्या हालचाली आता अंतिम टप्प्यात असल्याची माहिती आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये काल झालेल्या मॅरेथॉन बैठकीत संभाव्य महाशिवआघाडीबाबत सकारात्मक चर्चा झाली आहे. त्यामुळे राज्यातील सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र त्याचवेळी या आघाडीत सत्तास्थापनेच्या नव्या फॉर्म्युल्यावरही चर्चा झाली असल्याची माहिती आहे.

संभाव्य मंत्र्यांची यादी पवारसाहेबांच्या टेबलवर..

राज्यात येऊ घातलेल्या महाशिवआघाडीच्या मंत्रिमंडळामधील राष्ट्रवादी काँग्रेसची नावे निश्चित करण्यात आली आहेत. मंत्रिमंडळातील राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची नावे घेऊन राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी पोहोचले आहेत. मंत्रिमंडळात राष्ट्रवादीकडून माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, ज्येष्ठ नेते छगन भुजबळ आणि नवाब मलिक, धनंजय मुंडे यांचा सहभाग असेल, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. या ज्येष्ठ नेत्यांसह मंत्रिमंडळात राष्ट्रवादीचे एकूण 15 मंत्री असतील, अशीही माहिती आहे. या सगळ्या नावांबद्दल आता शरद पवार यांच्या निवासस्थानी खलबते सुरू असून लवकरच सर्व मंत्र्यांच्या नावावर अंतिम शिक्कामोर्तब होणार आहे.

दरम्यान, विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला आणि राष्ट्रवादीला मिळालेल्या जागांमध्ये फारसा फरक नाही. त्यामुळेच राष्ट्रवादीकडून अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रिपदाची मागणी करण्यात आल्याची चर्चा होती. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनीही याबाबत भाष्य केले आहे. सत्तास्थापनेच्या 50-50 फॉर्म्युल्याबद्दल बोलताना विजय वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्रिपदाची पहिली टर्म शिवसेनेला मिळेल, अशी बैठकीत चर्चा झाल्याची माहिती दिली आहे. त्यामुळे साहजिकच दुसऱ्या टर्ममध्ये मुख्यमंत्रिपद राष्ट्रवादीकडे जाण्याची शक्यता आहे. सत्तेचं गणित जुळून आल्यास महाराष्ट्रात तब्बल 20 वर्षांनंतर शिवसेनेचा मुख्यमंत्री बसणार आहे. मुख्यमंत्रिपदासाठी शिवसेनेतूनच तीन तर राष्ट्रवादीकडून एका नेत्याचं नाव चर्चेत आहेत.

Published by: Sandip Parolekar
First published: November 21, 2019, 11:55 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading