मुंबई, 29 जून : मुंबईच्या पोलीस आयुक्तापदी (Mumbai Police Commissioner) विवेक फणसाळकर (Vivek Phansalkar) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे विवेक फणसाळकर हे मुंबईचे नवे पोलीस आयुक्त असणार आहेत. मुंबईचे सध्याचे पोलीस आयुक्त संजय पांडे (Sanjay Pandey) हे उद्या निवृत्त होणार आहेत. त्यामुळे राज्य सरकारने (Maha Vikas Aghadi) फणसाळकर यांची मुंबई पोलीस आयुक्तपदी नियुक्ती केली. राज्यातील अस्थिर राजकिय स्थितीत कायदा-सूव्यवस्थेचा सर्वात महत्वाचा प्रश्न निर्माण झालाय. अशा अवस्थेत वरिष्ठ IPS अधिकारी आणि ठाणे शहराचे माजी पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांनी काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची भेट घेतली होती. विवेक फणसाळकर मुंबई पोलीस आयुक्त पदासाठी इच्छुक होते. त्यामुळेच ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी आले होते, अशी माहिती सूत्रांनी दिली होती. त्यानंतर आज लगेच राज्य सरकारने फणसाळकर यांची मुंबई पोलीस आयुक्तपदी नियुक्ती केल्याची माहिती समोर आली आहे.
विवेक फणसाळकर मुळचे पुण्याचे असून त्यांना त्यांचे शिक्षण देखील पुण्यात पूर्ण केलंय. बी ई इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड टेलिकाॅम असलेले विवेक फणसाळकर यांनी एमआयटी इंजिनिअरींग काॅलेजमध्ये टेल्कोचे लेक्चरर म्हणून करीअरची सुरुवात केली होती. हे करत असताना त्यांनी युपीएससीची परीक्षा दिली आणि १९८९ मध्ये महाराष्ट्र कॅडरमधून विवेक फणसाळकर यांची निवड झाली.
(मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज राजीनामा देणार, खात्रीलायक सूत्रांची माहिती)
विवेक फणसाळकर हे १९८९ बॅचचे आयपीएस अधिकारी असून अकोला येथे अतिरिक्त पोलीस अधिक्षक पदी त्यांची पहिली वर्णी लागली होती. त्यानंतर राज्यपाल डाॅक्टर पीसी असेक्झांडर यांचे एडीसी म्हणुन विवेक फणसाळकर यांनी काम पाहलंय. वर्ध्याचे पोलीस अधिक्षक, बोसनिया येथे यु एस मिशन करता त्यांची निवड झाली होती.
विवेक फणसाळकर यांनी पोलीस उपायुक्त नाशिक, पोलीस अधिक्षक सीआयडी क्राईम नागपूर, फायनान्स आणि कंपणी अफेअर्स मंत्रालयात ज्वाईंट डायरेक्टर पदावर काम पाहलंय. टेक्सटाईल मंत्रालयात विजीलंस डायरेक्टर, अतिरिक्त पोलीस आयुक्त ठाणे आणि पुणे पदी देखील विवेक फणसाळकर यांनी काम पाहलंय.
मुंबई वाहतूक पोलीस दलात सह पोलीस आयुक्तपदी देखील त्यांनी उत्तम कामगिरी केलीय. त्यानंतर सह पोलीस आयुक्त प्रशासन मुंबई पोलीस, अतिरिक्त पोलीस महासंचालक दहशतवादी विरोधी पथक आणि अतिरिक्त पोलीस महासंचालक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग असा प्रवास करत विवेक फणसाळकर यांनी ठाणे पोलीस आयुक्त पदाचा कार्यभार उत्तमरित्या पूर्ण केला. त्यानंतर त्यांची मुंबई पोलीस आयुक्तपदी वर्णी लागणार असं बोलत असतानाच लाचलुचपत प्रतिबंध विभागात अतिरिक्त पोलीस महासंचालकपदी विवेक फणसाळकर यांची बदली करण्यात आली आणि परमबीर सिंग यांची अचानक मुंबई पोलीस आयुक्त पदावरुन बदली केल्यानंतर हेमंत नगराळे यांची वर्णी मुंबई पोलीस आयुक्त पदी लागली. तर हेमंत नगराळे यांच्यानंतर संजय पांडे यांची वर्णी लागली होती आणि आता त्यांचा कार्यकाळ संपताच आता विवेक फणसाळकर यांची वर्णी लागलीय.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.