मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

महाराष्ट्रात गणपती विसर्जनाला मोठं गालबोट, एकूण 16 जण बुडाले

महाराष्ट्रात गणपती विसर्जनाला मोठं गालबोट, एकूण 16 जण बुडाले

प्रातिनिधिक फोटो

प्रातिनिधिक फोटो

अनेक जिल्ह्यांमध्ये गणपती विसर्जनासाठी गेलेले तरुण बुडाल्याच्या घटना घडल्या आहेत.

    मुंबई, 1 सप्टेंबर : कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सिंग पाळण्याचं आवाहन करण्यात येत आहे. त्यामुळे महाराष्ट्रात साधेपणाने गणेश विसर्जन करण्यात आलं. मात्र असं असतानाही अनेक जिल्ह्यांमध्ये गणपती विसर्जनासाठी गेलेले तरुण बुडाल्याच्या घटना घडल्या आहेत. राज्यात आज एकूण 16 जण बुडाले असून यापैकी 11 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 3 जणांना वाचवण्यात यश आलं आहे. तसंच 2 तरुणांचा शोध सुरू आहे. कुठे-कुठे घडल्या दुर्दैवी घटना? जळगाव जळगावमधील भुसावळ येथील तापी नदीत गणेश विसर्जनासाठी गेलेले पाच तरुण तापी नदीपात्रात बुडाले. स्थानिकांनी 5 जणांपैकी 3 जणांना वाचवले 2 जणांचा अद्याप शोध सुरू आहे. हे पाचही युवक भुसावळ शहरातील शनिमंदिर वॉर्डमधील असल्याची माहिती मिळाली आहे. ZTS जवळील रेल्वे पुलाजवळ ही घटना घडली. जळगाव जिल्ह्यातीलच चोपडा तालुक्यातल्या विरवाडे येथंही दुर्घटना घडली. गणपती विसर्जनासाठी गेलेल्या तीन तरुणांचा नदीत बुडून मृत्यू झाला आहे. गणपती विसर्जनावेळी जीव गमावलेल्या तरुणांमध्ये दोन सख्खे व एक चुलत अशा तीन भावांचा समावेश आहे. पुणे गणपती विसर्जनासाठी गेलेल्या तरुणाचा पाण्याच्या खाणीत बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना पुण्यात घडली. कृष्णा मारुती लोकरे ( वय. 18) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. नाशिक नाशिक जिल्ह्यात गणेश विसर्जनावेळी 5 युवकांचा मृत्यू झाला आहे. यातील चौघांचा विसर्जन करताना नदीत आणि विहिरीत मृत्यू, तर एकाचा सेल्फी घेताना मृत्यू झाला आहे. नाशिक जिल्ह्यातील बळींची नावं : - नरेश नागेश कोळी या युवकाचा,देवळाली गावात,वालदेवी नदीत मृत्यू - अजिंक्य राजाराम गायधनी या युवकाचा संगमावर,दारणा नदीत मृत्यू - प्रशांत वसंत गुंजाळ या युवकाचा,देवळा गावात,विहिरीत विसर्जन करताना बुडून मृत्यू - रवींद्र रामदास मोरे या युवकाचा,पिंपळगाव बसवंतला कादवा नदीत बुडून मृत्यू - इगतपुरीला दरीच्या तोंडावर सेल्फी घेत असताना पाय घसरून पडल्यानं एकाचा मृत्यू (250 फूट खोल दरीत कोसळलेला शेखर गवळी हा युवक रणजीपटू खेळाडू - मित्रांसोबत ट्रेकिंग साठी शेखर इगतपुरीला गेला होता) अकोला अकोला इथं आज नागझरी येथे गणपती विसर्जनासाठी गेलेल्या दोन भावांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. हे दोघेही अकोला शहरातील बाळापूर नाका येथील रहिवासी असल्याची माहिती आहे.
    Published by:Akshay Shitole
    First published:

    पुढील बातम्या