Elec-widget

शरद पवार आणि उद्धव ठाकरेंची उद्या भेट, 'या' निर्णयावर होणार शिक्कामोर्तब

शरद पवार आणि उद्धव ठाकरेंची उद्या भेट, 'या' निर्णयावर होणार शिक्कामोर्तब

राज्यातील सत्ता संघर्षावर गेल्या आठवड्याभरापासून दिल्लीत जोरदार बैठका झाल्या. अखेर काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या बैठकांमधून स्थिर सरकार स्थापन करण्यासाठी निर्णय झाला आहे.

  • Share this:

मुंबई, 21 नोव्हेंबर : गेल्या काही दिवसांपासून रखडलेला सत्ता स्थापनेचा तिढा अखेर सुटण्याच्या मार्गावर आहे. आघाडीच्या बैठकीनंतर आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट होणार आहे. या बैठकीमध्ये सत्ता स्थापनेसाठी अंतिम निर्णय होणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

राज्यातील सत्ता संघर्षावर गेल्या आठवड्याभरापासून दिल्लीत जोरदार बैठका झाल्या. अखेर काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या बैठकांमधून स्थिर सरकार स्थापन करण्यासाठी निर्णय झाला आहे. आता मुंबईत सत्ता स्थापनेचा निर्णय होईल, असं स्पष्ट झालं आहे.

उद्या शुक्रवारी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची मुंबईत भेट होणार आहे. या भेटीत सत्ता स्थापनेच्या निर्णयावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. शिवसेनेसोबत बैठक झाल्यानंतर शपथविधी सोहळ्याच्या तारखेचा अंतिम निर्णय घेतला जाणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. त्यानंतर सोमवारी राज्यपालांना भेटून सत्ता स्थापनेचा दावा करण्याची शक्यता आहे.

22 आणि 23 नोव्हेंबरला राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे दिल्लीत असणार आहे. या दोन्ही दिवशी राज्यपाल हे दिल्लीत राष्ट्रपती भवन येथे कॉन्फरन्ससाठी हजर राहणार आहे. दिल्ली दौरा आटोपून ते २४ तारखेला संध्याकाळी मुंबईत परततील अशी माहिती राजभवनाकडून देण्यात आली आहे. यानंतरच महाविकासआघाडीला सत्तास्थापनेचा दावा करता येणार आहे आहे.

Loading...

महाशिवआघाडी नव्हे महाविकासआघाडी

दरम्यान, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये सत्तास्थापनेचा फॉर्म्युला अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीच्या एकत्रित आघाडीमुळे राज्याला पर्यायी सरकार मिळेल अशी शक्यता आहे. मात्र, यावेळी काँग्रेसनं अनेक अटी घातल्याचं कळतं आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे महाशिवआघाडीऐवजी नव्या आघाडीचं नाव महाविकासआघाडी असेल अशी अट काँग्रेसनं घातली आहे. त्यामुळे आता शिव शब्द वगळला जाऊन महाविकासआघाडी असं नवं नाव जन्माला आलं आहे.

असा ठरला फॉर्म्युला!

त्याचसोबत काँग्रेस थेट शिवसेनेला पाठिंबा देणार नाही तर राष्ट्रवादीला पाठिंब्याचं पत्र देणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तसंच 11-11-11 असा सत्तावाटपाचा फॉर्म्युला ठरल्याचं कळतंय. त्याचप्रमाणे शिवसेनेला आपला हिंदुत्वाचा अजेंडाही सोडावा लागणार आहे.

महाराष्ट्रात शिवसेनेबरोबर सरकार स्थापन करताना काँग्रेसनं धर्मनिरपेक्ष शब्द वापरण्याची सूचना केली आहे. सोनियांच्या निवासस्थानी पार पडलेल्या बैठकीत यावर निर्णय झाल्याचं कळतंय. दरम्यान, मुख्यमंत्रिपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. शिवसेनेशी चर्चा झाल्यानंतर पुढचा निर्णय कळवला जाईल असं आघाडीनं स्पष्ट केलंय. त्यामुळे शिवसेनेला 5 की अडीच वर्ष मुख्यमंत्रिपद मिळणार हे पाहावं लागेल.

शिवसेनेची शुक्रवारी बैठक

दरम्यान, उद्या सकाळी 10 वाजता 'मातोश्री'वर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या अध्यक्षतेखाली सर्व शिवसेना आमदारांची बैठक पार पडणार आहे. 'मातोश्री'वर सकाळीच होणाऱ्या या बैठकीत शिवसेनेची सत्ता स्थापनेची अधिकृत भूमिका स्पष्ट होणार आहे. सर्व आमदारांना आधारकार्ड, कागदपत्रं आणि 5 दिवसांचे कपडे घेऊन बोलण्यात आलंय. तसंच आमदारांच्या मतदारसंघात आणि कार्यकर्त्यांमध्येही संभ्रम निर्माण झाला आहे. यावर चर्चा करण्यासाठी 'मातोश्री'वर शिवसेनेचे सर्व आमदार आणि उद्धव ठाकरे यांच्यात आता थेट संवाद होणार आहे.

==========================================

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 21, 2019 08:13 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...