शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यातील बैठक संपली

शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यातील बैठक संपली

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार मुंबईमध्ये दाखल झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी सिल्वर ओक इथं जाऊन भेट घेतली.

  • Share this:

मुंबई, 22 नोव्हेंबर : गेल्या काही दिवसांपासून रखडलेला सत्ता स्थापनेचा तिढा अखेर सुटण्याच्या मार्गावर आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार मुंबईत दाखल झाले. त्यानंतर रात्री उशिरा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची बैठक पार पडली. या बैठकीनंतर सकाळी बोलणारा, एवढीच प्रतिक्रिया देऊन ते बाहेर पडले.

गेल्या आठवड्याभरापासून नवी दिल्लीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या बैठक पार पडल्या. त्यानंतर दोन्ही पक्षाचे नेते मुंबईत दाखल झाले आहे. शरद पवार हे मुंबईतील सिल्वर ओक या निवास्थानी पोहोचले. त्यानंतर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत 'मातोश्री'वरून  शरद पवार यांची भेट घेण्याकरता सिल्वर ओक इथं पोहोचले. शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये जवळपास सव्वा तास चर्चा झाली. ही बैठक कशासासाठी होती याची माहिती अद्याप कळू शकली नाही. परंतु, या बैठकीतून बाहेर पडल्यानंतर पत्रकारांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत बोलण्याचा प्रयत्न केला असता, 'आपण सकाळी बोलणार' असं सांगून ते 'मातोश्री'कडे रवाना झाले.

शरद पवार यांच्यासोबत या बैठकीला उद्धव ठाकरे, आदित्य, सेनेचे खासदार संजय राऊत, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, जयंत पाटील हे उपस्थितीत होते.

शिवसेनेची आता मह्त्त्वाची बैठक

दरम्यान, शुक्रवारी सकाळी 10 वाजता 'मातोश्री'वर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या अध्यक्षतेखाली सर्व शिवसेना आमदारांची बैठक पार पडणार आहे. 'मातोश्री'वर सकाळीच होणाऱ्या या बैठकीत शिवसेनेची सत्ता स्थापनेची अधिकृत भूमिका स्पष्ट होणार आहे. सर्व आमदारांना आधारकार्ड, कागदपत्रं आणि 5 दिवसांचे कपडे घेऊन बोलण्यात आलंय. तसंच आमदारांच्या मतदारसंघात आणि कार्यकर्त्यांमध्येही संभ्रम निर्माण झाला आहे. यावर चर्चा करण्यासाठी 'मातोश्री'वर शिवसेनेचे सर्व आमदार आणि उद्धव ठाकरे यांच्यात आता थेट संवाद होणार आहे.

महाशिवआघाडी नव्हे महाविकासआघाडी

दरम्यान, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये सत्तास्थापनेचा फॉर्म्युला अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीच्या एकत्रित आघाडीमुळे राज्याला पर्यायी सरकार मिळेल अशी शक्यता आहे. मात्र, यावेळी काँग्रेसनं अनेक अटी घातल्याचं कळतं आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे महाशिवआघाडीऐवजी नव्या आघाडीचं नाव महाविकासआघाडी असेल अशी अट काँग्रेसनं घातली आहे. त्यामुळे आता शिव शब्द वगळला जाऊन महाविकासआघाडी असं नवं नाव जन्माला आलं आहे.

असा ठरला फॉर्म्युला!

त्याचसोबत काँग्रेस थेट शिवसेनेला पाठिंबा देणार नाही तर राष्ट्रवादीला पाठिंब्याचं पत्र देणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तसंच 11-11-11 असा सत्तावाटपाचा फॉर्म्युला ठरल्याचं कळतंय. त्याचप्रमाणे शिवसेनेला आपला हिंदुत्वाचा अजेंडाही सोडावा लागणार आहे. महाराष्ट्रात शिवसेनेबरोबर सरकार स्थापन करताना काँग्रेसनं धर्मनिरपेक्ष शब्द वापरण्याची सूचना केली आहे. सोनियांच्या निवासस्थानी पार पडलेल्या बैठकीत यावर निर्णय झाल्याचं कळतंय. दरम्यान, मुख्यमंत्रिपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. शिवसेनेशी चर्चा झाल्यानंतर पुढचा निर्णय कळवला जाईल, असं आघाडीनं स्पष्ट केलंय. त्यामुळे शिवसेनेला 5 की अडीच वर्ष मुख्यमंत्रिपद मिळणार हे पाहावं लागेल.

==============================

Published by: sachin Salve
First published: November 21, 2019, 11:17 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading