पळवून आणलेल्या अल्पवयीन पोरीसोबत...,जितेंद्र आव्हाडांनी दिलं शेलारांना सणसणीत प्रत्युत्तर

पळवून आणलेल्या अल्पवयीन पोरीसोबत...,जितेंद्र आव्हाडांनी दिलं शेलारांना सणसणीत प्रत्युत्तर

आशिष शेलारांच्या आरोपानंतर जितेंद्र आव्हाड यांनी टि्वट करून आपल्या शैलीत उत्तर दिलं. हा पोरखेळ नाहीये, वडीलधाऱ्या लोकांच्या सहमतीने/आशीर्वादाने वाजतगाजत होणारे लग्न आहे.

  • Share this:

मुंबई, 25 नोव्हेंबर : शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसने सर्व 162 आमदारांना घेऊन मुंबईत जोरदार शक्तीप्रदर्शन केलं. आम्ही काही पळवून आणलेल्या अल्पवयीन पोरीसोबत केलेलं बेकायदेशीर लग्न नाही असं म्हणत राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी भाजपचे नेते आशिष शेलार यांच्यावर टीकास्त्र सोडले.

मुंबईतील ग्रँड हयात हॉटेलमध्ये महाविकास आघाडीने केलेल्या या शक्तीप्रदर्शनावर भाजपचे नेते आशिष शेलार यांनी तातडीने पत्रकार परिषद घेऊन फोटो तुमचा, फोटोग्राफर तुमचा पण फोटो फिनिश मात्र देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार करणार असल्याचा दावा  केला. तसंच 145 आमदार सुद्धा या कार्यक्रमाला नव्हते, असा आरोपही त्यांनी केला.

आशिष शेलारांच्या आरोपानंतर जितेंद्र आव्हाड यांनी टि्वट करून आपल्या शैलीत उत्तर दिलं. हा पोरखेळ नाहीये, वडीलधाऱ्या लोकांच्या सहमतीने/आशीर्वादाने वाजतगाजत होणारे लग्न आहे. पळवून आणलेल्या अल्पवयीन पोरीसोबत केलेलं बेकायदेशीर लग्न नाही जिथे ते सिद्ध करायला घाबरून कोर्टात दिवस ढकलताय.लोकशाही शी खेळ करणाऱ्यांनी आपले बघावे बहुमताचा दांडू तुमची विटी करणार, अशा शब्दात आव्हाडांनी पलटवार केला.

162 पेक्षा जास्त आमदार संपर्कात -शरद पवार

दरम्यान, यावेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आमच्याकडे 162 आमदारांचं समर्थन तरच आहे आणखीही आमदार संपर्कात आहे, असा दावा केला आहे.

आज केंद्राची सत्ता ज्याच्या हातात आहे. त्यांनी देशातल्या काही राज्यात बहुमत नसताना देखील सत्ता स्थापन केली आहे. संसदीय पद्धतीच्या मार्गदर्शन तत्वांना हरताळ फासून सत्तेचा गैरवापर केला जात आहे.  उद्या जर कोर्टाने आपल्याला विश्वासदर्शक ठराव सादर करण्यास सांगितले तर सहज करू, आमच्याकडे 162 आमदाराचं नाहीतर आणखी आमदार संपर्कात आहे. आज 162 आमदार समोर आहे, अजून काही आमदार दाखवायचे असेल तर तेही दाखवू, असा दावाही शरद पवार यांनी केला आहे.

अजित पवार हे पक्षाचे आता गटनेते नाही. त्यांना कोणताही व्हीप काढण्याचा अधिकार नाही. त्यामुळे घाबरून जाण्याचं कारण नाही, तुमची वैयक्तिक जबाबदारी ही माझी आहे, असा विश्वासही पवारांनी सर्व आमदारांना दिला.

यावेळी महाआघाडीचे १६२ आमदारांचे एकत्र फोटोसेशन आणि ओळख परेडही पार पडली. यावेळी आमदारांनी एकत्र राहण्याची शपथही देण्यात आली. या कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खरगे, अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात यांच्यासह सर्व नेते हजर आहे.

अजित पवारांनी सोबत यावं -धनंजय मुंडे

तर या कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना धनंजय मुंडे यांनी पहिल्यांदाच त्या दिवशी काय घडलं याबद्दल स्पष्टीकरण दिलं आहे. 'ज्या दिवशी अजित पवारांनी बंड पुकारले त्याबद्दल मला कोणतीही कल्पना नव्हती. मी दुसऱ्या दिवशी 1 वाजेपर्यंत घरी झोपलेलो होतो. अजित पवारांचा निर्णय हा त्यांचा आहे. माझं अजित पवारांवर प्रेम हे वेगळं आहे आणि माझी निष्ठा ही पूर्णपणे शरद पवारांसोबतच आहे. पवारांसोबत मरेपर्यंत एकनिष्ठ राहणार आहे' असं धनंजय यांनी सांगितलं.

'अजित पवार यांनी जो काही निर्णय घेतला. तो त्यांचा व्यक्तिगत आहे. जेव्हा आम्ही निवडणुकीसाठी मैदानात उतरलो तेव्हा शरद पवार आणि अजितदादा यांच्या नेतृत्त्वाखाली लढलो. आम्ही इतके दिवस अजित पवार यांच्यासोबत काम केलं. त्यामुळे त्यांनी परत यावं ही आमची अपेक्षा आहे,  अशी अपेक्षाही धनंजय यांनी बोलून दाखवली.

अजितदादा जोपर्यंत पक्षासोबत होते, तोपर्यंत मी त्यांच्यासोबत होतो. ते गेल्यानंतर कोणताही संपर्क झाला नाही. अजित पवार हे व्हीप काढतील हे सगळं काही कपोलकल्पित आहे. उद्या असं काहीही होणार नाही, असंही धनंजय यांनी सांगितलं.

=======

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 25, 2019 10:03 PM IST

ताज्या बातम्या