असे असेल राज्यातील पुढील सरकार; वाचा सत्ता स्थापनेचे चार पर्याय!

असे असेल राज्यातील पुढील सरकार; वाचा सत्ता स्थापनेचे चार पर्याय!

राज्यातील सत्ता स्थापनेतील तिढ्यामध्ये कोणते मार्ग शिल्लक आहेत. जाणून घेऊयात...

  • Share this:

मुंबई, 30 ऑक्टोबर: विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होऊन सहा दिवस झाले तरी अद्याप सरकार स्थापन करण्याचा मुहूर्त काही नक्की ठरत नाही. राज्यातील मतदारांनी पुन्हा एकदा महायुतीकडे सत्ता दिली असली तरी आता त्या सत्तेत कोणाचा किती वाटा असावा यावर शिवसेना आणि भाजपमध्ये जुंपली आहे. शिवसेना किती ही आग्रह करत असली तरी शेवटी भाजपच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन होईल याचा त्यांना विश्वास वाटतो. येत्या शुक्रवारी देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील असा विश्वास भाजपला वाटतो. अर्थात मुख्यमंत्रीपद आणि महत्त्वाची खाती याबाबत शिवसेना ठाम आहे. सत्तास्थापनेतील या तिढ्यामध्ये राज्यात सरकार स्थापन होण्याचे कोणते मार्ग शिल्लक आहेत. जाणून घेऊयात त्याचे पर्याय...

परिस्थिती क्रमांक 1: भाजप शिवसेना

राज्यात सरकार स्थापनेची सर्वात अधिक शक्यता वाटते ती भाजप आणि शिवसेना एकत्र येण्याची होय. दोन्ही पक्ष त्यांच्या भूमिकेवर ठाम राहण्यामागे महत्त्वाचे कारण दबाव निर्माण करण्याचा असल्याचे मानले जात आहे. शिवसेना कमी जागेवर लढली आणि भाजपला 2014च्या तुलनेत कमी जागा मिळाल्या. या दोन्ही गोष्टींकडे शिवसेना एक संधी म्हणून पाहत आहे. मंगळवारी दोन्ही पक्षातील नेत्यांमध्ये सरकार स्थापने संदर्भात चर्चा होणार होती ही बैठक शिवसेनेने रद्द केली. त्याच बरोबर शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनामधून PM मोदींवर हल्ला चढवण्यात आला होता. 2019च्या लोकसभा निवडणुकीच्या आधी निश्चित झालेल्या गोष्टीवरून दोन्ही पक्ष आता जरी लढत असले तरी काही दिवसात हे मतभेद दूर होतील आणि राज्यात सत्ता स्थापन करतील.

परिस्थिती क्रमांक 2: भाजप अपक्ष छोटे पक्ष

विधानसभेच्या 288 जागांपैकी 105 जागा भाजपकडे आहेत. जर शिवसेनेने त्यांना पाठिंबा दिला नाही तर सरकार स्थापन करण्यासाठी त्यांना आणखी 40 सदस्यांची गरज लागले. जर भाजपने 13 अपक्ष आमदारांचा पाठिंबा मिळवला तर त्यांच्या अडचणी बऱ्यापैकी कमी होऊ शकतील. अशा परिस्थितीत त्यांचे संख्याबळ 118 वर पोहोचेल. 118 आमदार झाल्यास भाजपला आणखी 27 जणांचा गरज लागेल. राज्यात काही छोट्या पक्षांकडे मिळून 16 जागा आहेत. यात ओवैसी यांच्या AIMIM आणि माकप सारख्या पक्षांचा समावेश आहे. पण हे पक्ष भाजप सोबत जातील का याबाबत शंका आहे.

परिस्थिती क्रमांक 3: शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे बाहेरून समर्थन

राज्याच्या आतापर्यंतच्या राजकीय इतिहासावर नजर टाकली तर अशी शक्यता कमी वाटते. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी क्राँग्रेसकडे 54 जागा आहेत. तर काँग्रेसकडे 44 जागा. या दोन्ही पक्षांनी शिवसेनेला बाहेरून पाठिंबा दिला तर शिवसेना सत्ता स्थापन करू शकते. असे झाले तर ठाकरे कुटुंबातील व्यक्ती मुख्यमंत्री होऊ शकते. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेस देखील शिवसेनेला बाहेरून पाठिंबा देऊ शकते. काँग्रेसने तसे संकेत देखील दिले आहेत. पण यासाठी शिवसेनेला पुढाकार घ्यावा लागेल असे काँग्रेस नेत्यांनी म्हटले आहे. निवडणुकीच्या आधी बँक घोटाळ्यात पवारांचे नाव आणल्याने ते भाजपवर नाराज आहेत. त्यामुळे भाजपला विरोधात बसवण्यासाठी आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारला बाहेरून पाठिंबा मिळू शकतो.

परिस्थिती क्रमांक 3: भाजपचे अल्पमताचे सरकार

2014मध्ये भाजपने काही दिवस अल्पमताचे सरकार चालवले होते. तेव्हा काही दिवश शिवसेना विरोधी पक्षात होती आणि राष्ट्रवादीने फडणवीस सरकारला ऑक्सिजन दिला होता. शरद पवार आणि अजित पवार यांच्या विरुद्ध ईडीची कारवाई केल्याने आता भाजपला राष्ट्रवादी पाठिंबा देणार नाही. पण राष्ट्रवादीने तसा पाठिंबा दिला तर पवार कुटुंबीयांच्या अडचणी कमी होईल असे बोलले जाते.

वरील चार पर्यायांपैकी कोणता पर्याय वापरून सरकार स्थापन होईल हे येणारा काळच सांगेल. त्याबद्दल आताच ठोसपणे काहीच सांगता येणार नाही. पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याआधीच स्पष्ट केले आहे की तेच पुढील 5 वर्ष मुख्यमंत्री असतील आणि राज्यात भाजपच्या नेतृत्वाचे सरकार असेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 30, 2019 12:02 PM IST

ताज्या बातम्या