मुंबई, 23 नोव्हेंबर : राज्यात सत्तास्थापनेची सध्याची गणितं पाहता...शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंची हिंदुत्ववादी शिवसेना इतिहासजमा होऊन उद्धव ठाकरेंची निधर्मी शिवसेना सत्तेत येणार आहे. काँग्रेसच्या निधर्मी धोरणांवर शिवसेनाप्रमुखांनी नेहमीच सडकून टीका केली होती. तर आता काँग्रेसच्या धोरणानुसार शिवसेनेची सत्तेकडे वाटचाल सुरू झाली आहे.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी काँग्रेसच्या निधर्मी भूमिकेवर नेहमीच घणाघाती टीका केली. निधर्मी हा शब्दच घटनेत नंतर समाविष्ट करण्यात आला, हा मुद्दा शिवसेनाप्रमुखांनी अनेकदा मांडला.
काँग्रेसच्या घराणेशाहीवर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांच्या हयातीत प्रचंड टीका केली. काँग्रेसला गांधी परिवाराशिवाय काहीच दिसत नाही असा टोला त्यांनी जाहीर सभांमध्ये लगावला.
बाळासाहेब ठाकरे यांची राजकीय कारकीर्द पाहिल्यास त्यांचा मुख्य शत्रू हा फक्त काँग्रेसच होता, यात शंकाच नाही. काँग्रेसला पराभूत करण्यासाठी शिवेसनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे मैदानात शड्डू ठोकायचे.
सोनिया गांधींच्या रूपानं इटली देशावर राज्य करत असल्याचा घणाघात बाळासाहेब ठाकरेंनी जाहीर सभेत केला होता.
काँग्रेसच्या निधर्मी भूमिकेवर बरसणारे बाळासाहेब ठाकरे, सोनिया गांधींसह गांधी परिवारावर सडकून टीका करणारे बाळासाहेब ठाकरे देशानं पाहिले. एकदा भूमिका घेतली की त्यात बदल न करणारे ठाकरे जगानं पाहिले. पण आता बाळासाहेबांची शिवसेना राहिली नाही.
ज्वलंत हिंदूत्त्व ते धर्मनिरपेक्षता असा अनाकलनीय प्रवास करणारी शिवसेना आता दिसत आहे. त्यामुळे आताची शिवसेना ही बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेपेक्षा वेगळी असून ती तत्त्वांपेक्षा सत्तेसाठी हपापलेली असल्याचं स्पष्ट होतं.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा