मुंबई, 16 ऑगस्ट : महाराष्ट्रात कोरोना बाधितांच्या (Covid cases in Maharashtra) संख्येत घसरण होत आहे. आता दैनंदिन कोरोना बाधितांची संख्या ही 5 ते 6 हजारांच्या आसपास असल्याचं समोर येत आहे. ही आकडेवारी जरी जास्त असेल तरी गेल्या काही दिवसांपूर्वीच्या आकडेवारीच्या तुलनेत खूपच कमी आहे. मात्र, असे असले तरी आता चिंता पुन्हा एकदा वाढली आहे. कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटने (Delta Plus variant of Coronavirus) महाराष्ट्राची चिंता वाढवली आहे. डेल्टा प्लस व्हेरिएंटच्या तीन वेगवेगळ्या विषाणूंनी तज्ज्ञांची चिंता वाढवली आहे. तज्ज्ञांच्या मते, डेल्टा प्लस व्हेरिएंटचे नवं रूप इतकं खतरनाक आहे की याच्या संक्रमण दराच्या संदर्भात अभ्यास करण्याची आवश्यकता आहे.
अलीकडेच व्हायरसच्या जीनोम सिक्वेंसींगमध्ये असे दिसून आले आहे की, महाराष्ट्रात डेल्टा प्लस व्हेरिएंटचे एकूण 66 रुग्ण आढळून आले आहेत. डेल्टा प्लस व्हेरिएंट ग्रुपचे तीन वेगवेगळे प्रकार आहेत. Ay.1, Ay.2 आणि Ay.3 . आता तज्ज्ञांनी डेल्टा प्लस विषाणूच्या आणखी 13 उप-वंशांचा शोध लावला आहे जो Ay.1, Ay.2 आणि Ay.3 पासून सुरू होतो आणि 13 पर्यंत आहे. डेल्टा व्हेरिएंटमध्ये म्युटेशन झाल्यावर डेल्टा प्लस व्हेरिएंट तयार होतो.
राज्यात डेल्टा प्लसचे 66 रुग्ण
राज्यात आतापर्यंत आढळून आलेल्या डेल्टा प्लस रुग्णांची संख्या 66 वर पोहोचली आहे. यापैकी सर्वाधिक रुग्ण हे जळगाव जिल्ह्यात असून त्यानंतर रत्नागिरी जिल्ह्यात डेल्टा प्लस विषाणूचे रुग्ण आहेत. राज्यात आतापर्यंत आढळून आलेल्या 66 डेल्टा प्लस रुग्णांपैकी 32 पुरुष असून 34 स्त्रिया आहेत.
खरा देवमाणूस! कोरोना काळात हा डॉक्टर मोफत करतोय रुग्णांवर उपचार
कुठल्या जिल्ह्यात डेल्टा प्लस व्हेरिएंटचे किती रुग्ण?
जळगाव - 13
रत्नागिरी - 12
मुंबई - 11
ठाणे - 6
पुणे - 6
पालघर, रायगड - प्रत्येकी 3
नांदेड, गोंदिया - प्रत्येकी 2
चंद्रपूर, अकोला, सिंधुदुर्ग, सांगली, नंदूरबार, औरंगाबाद, कोल्हापूर, बीड - प्रत्येकी 1
या 66 रुग्णांपैकी 10 जणांचे दोन्हीही कोविड डोस झालेले आहेत तर 8 जणांनी केवळ 1 डोस घेतलेला आहे. लसीकरण झालेल्यांपैकी 2 व्यक्तींनी कोवॅक्सिन तर इतर सर्वांनी कोविशिल्ड लस घेतलेली आहे.
या 66 रुग्णांपैकी 5 जणांचे मृत्यू झाले आहेत. त्यापैकी 3 पुरुष आहेत तर 2 स्त्रिया आहेत. दोन मृत्यू हे रत्नागिरी जिल्ह्यातील तर प्रत्येकी एक मृत्यू बीड, मुंबई, रायगड येथील आहेत. मृत्यू झालेले पाचही रुग्ण हे 65 वर्षांवरील असून त्या सर्वांना अतिजोखमीचे आजार होते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Coronavirus