मुंबई 10 डिसेंबर: राज्यात कोरोना रुग्णांचा आलेख (Corona virus graph) उतरणीला लागला असून कोरोनामुक्त होणाऱ्यांचं प्रमाण वाढलं आहे. राज्यात गुरुवारीही 5 हजारांपेक्षा जास्त रुग्ण बरे झाले. राज्याचा Recovery Rate हा आता 93.52 टक्क्यांवर गेला आहे. कोरोनामुक्त होणाऱ्यांची एकूण संख्या ही आता 17 लाख 47 हजारांच्या जवळ गेली आहे. तर दिवसभरात 3 हजार 824 नवे रुग्ण आढळून आलेत. राज्यातल्या एकूण रुग्णांची संख्या ही 18 लाख 68 हजार 172 एवढी झालीय. राज्यात आज 70 जणांचा मृत्यू झाला. राज्यात आत्तापर्यंत 1 कोटी 15 लाखांपेक्षा जास्त कोविड चाचण्या घेण्यात आल्या आहेत. त्यात कोविड बाधितांचं प्रमाण हे 16.24 टक्के एवढं आहे.
मुंबईत (Mumbai) गेल्या काही दिवसांच्या तुलनेत कोरोनाची (Coronavirus) रुग्णसंख्या कमी झाली आहे. मात्र असे असले तरीही कोरोनाचा धोका अद्याप कमी झालेला नाही. दरम्यान मुंबईचे आयुक्त इकबाल सिंह चहल (Ikbal singh chahal) यांनी इशारा दिला आहे. ते म्हणाले की कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन केल्यास मुंबईत नाईट कर्फ्यू (Mumbai Night curfew) लावण्यात येईल.
मुंबईचे आयुक्त म्हणाले की, परवा मुंबईतील दोन ठिकाणी छापेमारी करण्यात आली होती. यावेळी हजारो लोक हे मास्क न लावता क्लबमध्ये पाहण्यात आले होते. लोक असेच वागत राहिले तर मुंबईत नाईट कर्फ्यू लावण्यात येईल. याबाबत मी मुंबईत नाईट कर्फ्यू लागू करण्याची मागणी केली आहे. नागरिकांना 15 दिवसांचा वेळ दिला आहे. त्यांनी आपले वर्तन सुधारले नाही तर आम्हाला नाईलाजाने नाईट कर्फ्टू लागू करावा लागेल. याशिवाय आम्ही ओपिटॉम्म क्लब यांच्याविरोधात एफआयआरदेखील दाखल केल्याचे आयुक्तांनी सांगितलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Coronavirus